लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) वाहन व परवानाच्या विविध शुल्कातून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांत ८७४ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. उद्दिष्टापेक्षा सुमारे ७८ कोटी ७० लाखांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. दुचाकी वाहनांना नागरिकांची पसंती असून, गेल्या चार वर्षांत तीन लाख २१ हजार ३०८ दुचाकी वाहनांची नोंद झाली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘वाहनांची नोंदणी वाढत असताना आरटीओचे उत्पन्नही वाढत आहे. २०१९-२० मध्ये आरटीओचे उत्पन्न ५८५ कोटी ६८ लाख, २०२०-२१ मध्ये करोनाचा फटका बसल्याने आरटीओचे उत्पन्न कमी होत ४३९ कोटी ५८ लाखांवर आले होते. २०२१-२२ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ६२१ कोटी १२ लाख, २०२२-२३ मध्ये प्रथमच ८७४ कोटी ७० लाख रुपयांचे उत्पन्न आरटीओला मिळाले आहे.’

आणखी वाचा- पिंपरीत २०२६ पर्यंत ५० टक्के ई-रिक्षांचा वापर करण्याचे लक्ष्य

शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या पिंपरी-चिंचवड आरटीओकडे २३ लाख ९२ हजार ५२१ वाहनांची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहन परवाना, पसंती क्रमांक, दंडांसह विविध शुल्कातून उत्पन्न मिळते, असे अतुल आदे यांनी स्पष्ट केले.

दुचाकींना पसंती

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढत आहे. दुचाकी, कार, रिक्षा, व्यावसायिक वाहने, बस या वाहनांची संख्या लक्षणीय आहे. २०१९-२० मध्ये एक लाख ५२ हजार २८६, २०२०-२१ मध्ये ९६ हजार ८३९, २०२१-२२ मध्ये एक लाख सात हजार १५१ आणि २०२२-२३ मध्ये एक लाख ६२ हजार ६४१ वाहनांची नोंद झाली आहे. गेल्या चार वर्षांत तीन लाख २१ हजार ३०८ दुचाकी वाहनांची नोंद झाली. त्याखालोखाल एक लाख ३२ हजार ४५८ चारचाकी वाहनांची नोंद झाली.

वाहन व परवानाच्या विविध शुल्कातून ८७४ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. मागील वर्षात दुचाकी, चारचाकी वाहनांची सर्वाधिक नोंद झाली. -अतुल आदे, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People preference for two wheelers in pimpri chinchwad pune print news ggy 03 mrj
Show comments