लोणावळा : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या खोटारडेपणाला देशातील शेतकरी, बेरोजगार युवक वैतागले आहेत. निवडणूक रोखे योजना रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणला आहे. येत्या निवडणुकीत जनता भाजपला जागा दाखवून देईल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली. शहरात आयोजित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी पटोले बोलत होते. शिबिरात बूथ लेव्हलपासून संघटनाबांधणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा >>> भाजपचे आमदार, खासदार आमच्यासोबत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
पटोले म्हणाले, की दिल्लीमध्ये महिला कुस्तीगीर यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले. महिला शोषणाचे प्रमाण वाढले आहे. केंद्रीय संस्थांचा वापर करत पक्ष फोडण्याचे आणि आमदार पळवण्याचे काम भाजप करत आहे. प्रथम भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नंतर त्यांना सोबत घ्यायचे असे धोरण असून, जनतेचे प्रश्न मांडणाऱ्यांवर हल्ले करायचे अशी तानाशही व्यवस्था प्रस्थापित केली आहे. शिबिरामध्ये न सांगता गैरहजर राहिलेल्या आमदारांना पक्षाकडून करणे दाखवा नोटीस देण्यात येणार असल्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात दोन जातींमध्ये भांडणे लावण्यात आली असून, महाराष्ट्र जाळण्याचे पाप भाजप करत आहे. जनता निवडणुकीची वाट पाहत असून, महाराष्ट्रच मोदी सरकारला दरवाजे बंद करण्यात अग्रेसर असेल, असेही पटोले म्हणाले.