गेल्या महापालिका निवडणुकीतील द्विसदस्यीय प्रभागरचनेनुसार पिंपरीत प्रत्येक प्रभागाला दोन नगरसेवक मिळाले. मात्र, गेल्या चार वर्षांचा कारभार पाहता ‘तीन तिघाड’ म्हणण्याऐवजी दोघांमध्येच वारंवार ‘बिघाड’ झाल्याचे चित्र दिसून आले आहे. टक्केवारीसाठीचा वाद, श्रेय मिळण्यावरून कुरघोडी, मोठा कोण यावरून मानापमान नाटय़ असे प्रकार बहुतेक सर्व प्रभागांमध्ये सातत्याने झाले. नगरसेवकांच्या आपापसातील भांडणामुळे पक्षाचे नेते वैतागले आणि अधिकारी हैराण झाले. या सगळ्या घडामोडीत विकासकामांचे मात्र ‘तीन तेरा’ वाजले आणि त्याचे खापर एकमेकांवरच फोडण्याचे राजकारणही झाले.
महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकांसाठी द्विसदस्यीय प्रभाग पद्धती होती. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील ६४ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडून आले. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असल्याने निम्म्या महिला सदस्या निवडून आल्या, अन्य दोघी खुल्या जागांमधून निवडून आल्या. एकाच प्रभागात दोन सदस्य असल्याचे फायदे कमी, तोटेच जास्त असल्याचे गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. प्रभागातील एखादे काम सुरू करण्यापासून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे श्रेय मिळवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात दोन्ही नगरसेवकांमध्ये वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे, कुणी किती टक्केवारी घ्यायची, कामाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करायचा, प्रकल्प अथवा वास्तूला नाव कोणाचे द्यायचे, अधिकाऱ्यांनी प्रभागात कामे अथवा पाहणी करताना कोणाला बरोबर घ्यायचे, दोन्ही नगरसेवकांमध्ये अधिकाऱ्यांनी नक्की कोणाचे आदेश मानायचे, पुरस्कारांसाठी शिफारशी कोणी करायच्या, बदल्यांची कामे कोणाच्या सांगण्यावरून होणार, सार्वजनिक कार्यक्रमात अधिक मान कोणाला, यांसारख्या शेकडो कारणांवरून नगरसेवकांमध्ये वाद झाले आहेत.
बहुतेक ठिकाणी नगरसेविकांचे पतिराज वादाचे कारण ठरले आहेत. नावाला नगरसेविका, कारभार सगळा पतिराजांकडे, अशी स्थिती बहुतांश प्रभागात आहे. स्वत: नगरसेवक असल्याच्या थाटात ही पतिराज मंडळी वावरतात तसेच व्यासपीठावर बसतात, सत्कार स्वीकारतात, भाषणेही ठोकतात, बैठकांना हजेरी लावतात. अधिकाऱ्यांना बोलावून झापणे, ठेकेदारांशी टक्केवारीची बोलणी करणे या कामांमध्ये त्यांनी कोणतीही कसूर सोडलेली नाही. सहकारी नगरसेवकांशी त्यांचे पटत नाही. या प्रकारांमुळे राजकीय नेते जितके हैराण तितकेच अधिकारीही वैतागले आहेत. आयुक्तांनाही याचे अनुभव अनेकदा आले आहेत. टक्केवारीचा पुरवठा करताना ठेकेदारांची दमछाक झाल्याचीही उदाहरणे आहेत. या प्रकारात प्रभागातील विकासकामांचे बारा वाजले आहेत. कामाचे श्रेय स्वत:ला मिळावे, यासाठी भांडणारी ही मंडळी अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे कामही तत्परतेने करत आहेत.
नगरसेवकांमधील वादाची कारणे
*  काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे
*  कामाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते
*  प्रकल्पाला नाव कोणाचे द्यायचे
*  अधिकाऱ्यांबरोबर कोणी पाहणी करायची
*  सार्वजनिक कार्यक्रमात मान कोणाला
*  विकासकामाचे श्रेय कोणाचे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा