भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थेच्या अथक परिश्रमानंतर सावरकर यांच्या मार्सेलिस येथील स्मारकास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सहकार्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या स्मारकास मान्यता दिली.
ब्रिटिशांच्या साम्राज्याला विरोध करीत त्यांच्याविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं प्रतीक म्हणजे सावरकरांनी मार्सेलिस बंदरावर मारलेली उडी. या उडीनंतर ते पकडले गेले असले तरी शिक्षा झाल्यानंतर बोटीतून उडी मारून बंदरापर्यंत पोहोचण्याचा सावरकरांचा हा निर्णय क्रांतिकारी आणि धाडसी असाच होता. त्यांनी जेथे उडी मारली तेथे स्मारक व्हावे या उद्देशातून सावरकरप्रेमींनी एकत्र येऊन सावरकर मध्यवर्ती संस्था स्थापन केली. संस्थेचे गणेश वढवेकर आणि नीलेश गायकवाड यांनी पुढाकार घेत या संकल्पनेचा पाठपुरावा केला. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी आणि मार्सेलिस येथील महापौरांशी पत्रव्यवहार केला. उडीचे भित्तिचित्र आणि सावरकर चरित्राची माहिती असे या स्मारकाचे स्वरूप असेल आणि हे स्मारक लोकवर्गणीतून उभारण्यात येईल, असे सांगण्यात आले. मार्सेलिस येथील महापौरांनी बंदराच्या किनाऱ्यावर उडीचे स्मारक उभारण्यासाठी परराष्ट्र खात्याकडे मंजुरी दिली आहे. फ्रान्स सरकारची लेखी परवानगी मिळण्यासाठी उशीर लागत असला, तरी हे स्मारक नक्की होईल, असे आश्वासन सुषमा स्वराज यांनी दिले असल्याचे वढवेकर आणि गायकवाड यांनी कळविले आहे.

Story img Loader