ध्वनिक्षेपकाच्या वापरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे र्निबध असले तरी यंदाच्या गणेशोत्सवात पाच दिवस त्यातून सवलत मिळणार आहे. उत्सवातील पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती आमदार मोहन जोशी यांनी शनिवारी दिली.
रात्री दहा ते पहाटे सहा या वेळामध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने र्निबध घातले आहेत. या र्निबधातून वर्षभारत १५ दिवस सवलत देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे राखून ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने हे दिवस निश्चित केले असून त्यातील तीन दिवस गणेशोत्सवासाठी दिले आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी मेहनतीने केलेली सजावट पाहण्यासाठी हे तीन दिवस अपुरे असल्याने आणखी सवलत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याला यश आल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.
मोहन जोशी म्हणाले, गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी पाचवा दिवस, गौरी विसर्जन आणि गणेश विसर्जन या तीन दिवशीच रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, पाचवा दिवस आणि गौरी विसर्जन हे एकाच दिवशी असल्यामुळे गणेशभक्तांना केवळ रात्री बारापर्यंतच्या सवलतीचा लाभ घेता आला. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा यासाठी सलग पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. उत्सवातील कोणते पाच दिवस ही सवलत द्यायची हे ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यंदाचे १४ ते १८ सप्टेंबर असे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.   

Story img Loader