नवीन औषधविक्री दुकानांना परवाने देण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. औषध विक्रेत्यांना परवान्यासाठीचे शुल्क भरण्यासाठीही अन्न व औषध (एफडीए) कार्यालयात हेलपाटे घालावे लागू नयेत, अशी सोय या यंत्रणेमुळे होणार आहे. इतकेच नव्हे तर परवानाधारक औषध विक्रेत्यांना नवीन फार्मासिस्टची नोंदणी करणे, परवान्याचे नूतनीकरण करणे अशा कामांसाठी या ऑनलाईन यंत्रणेचा उपयोग होणार आहे.
http://www.xlnfdca.guj.nic या संकेतस्थळावरून या यंत्रणेचा लाभ घेता येणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, चंडीगढ, केरळ आणि गोवा या राज्यांतील औषध विक्रेत्यांच्या परवाना प्रक्रियेसाठी हे संकेतस्थळ वापरण्यात येत असून त्यावरील ‘एमएच’ (महाराष्ट्र) हा पर्याय निवडून राज्यातील औषध विक्रेते पुढील प्रक्रिया ऑनलाईनच पार पाडू शकतील.
पूर्वी नवीन औषध दुकानांसाठी परवाना घेताना विक्रेत्यांना एफडीए कार्यालयात अर्ज भरून द्यावा लागत असे. अर्ज करण्यासह औषध विक्रेते आता परवान्यासाठीचे शुल्कही ऑनलाईन भरू शकणार आहेत. विक्रेत्याने केलेला अर्ज त्या-त्या ठिकाणच्या औषध निरीक्षकाकडे गेल्यानंतर एफडीएद्वारे दुकानाची प्रत्यक्ष तपासणी करून तपासणीचा अहवाल विक्रेत्याला पाहण्यासाठी ऑनलाईन अपलोड केला जाईल. राज्य सरकारच्या ‘ग्रास’ (गव्हर्न्मेंट रिसिट अकाऊंटिंग सिस्टिम) या संकेतस्थळावरही परवान्याचे शुल्क भरण्याची सोय उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर शुल्क भरून त्याची पावती xlnfdca.guj.nic या संकेतस्थळावर अर्ज भरताना अपलोड करता येईल. संकेतस्थळावरून क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरण्याची व्यवस्थाही लवकरच उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती औषध विभागाचे सह आयुक्त बा. रे. मासळ यांनी दिली.
मासळ म्हणाले, ‘‘नवीन परवाने घेऊ इच्छिणाऱ्यांबरोबरच परवानाधारक औषध विक्रेत्यांनाही xlnfdca.guj.nic या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे. या विक्रेत्यांना संकेतस्थळावर यूझर आयडी आणि पासवर्ड मिळेल. त्याद्वारे दुकानात नवीन फार्मासिस्टची नियुक्ती करणे, किरकोळ विक्री परवान्याबरोबरच घाऊक विक्रीसाठी परवाना घेणे, परवान्याचे नूतनीकरण करणे अशी कामे ऑनलाईन होऊ शकतील. या विक्रेत्यांनी संकेतस्थळावर आपले भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्यावर त्यांनी केलेले अर्ज प्रक्रियेच्या कोणत्या पातळीत आहेत याची माहिती भ्रमणध्वनी संदेशाद्वारे त्यांना मिळू शकेल.’’
औषध दुकानांची परवाना प्रक्रिया ऑनलाईन
नवीन औषधविक्री दुकानांना परवाने देण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे. औषध विक्रेत्यांना परवान्यासाठीचे शुल्क भरण्यासाठीही अन्न व औषध (एफडीए) कार्यालयात हेलपाटे घालावे लागू नयेत, अशी सोय या यंत्रणेमुळे होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 21-11-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permit system online of medicine shop