पुणे : खून प्रकरणात गेली सात वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील काशीगाव परिसरातून अटक केली. आरोपी गेली सात वर्षे नाव बदलून वेगवेगळ्या भागांत वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील लक्ष्मण पवार (वय ३४, रा. गोखलेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पवार याच्याविरुद्ध २०१७ मध्ये चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. किरकोळ वादातून त्याने एकाचा खून केला होता. त्यानंतर पवार पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. न्यायालयाने त्याला फरार घाेषित केले. त्यानंतरही तो न्यायालयात हजर झाला नाही.

हेही वाचा – पिंपरी: शेअर ट्रेडिंग अ‍ॅपमधील गुंतवणुकीच्या बहाण्याने गंडा घालणारी टोळी अटकेत; चार कोटींचे व्यवहार

हेही वाचा – पुणेकरांनो, शहरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी तुम्हीच तपासा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार

गुन्हे शाखा दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे यांचे पथक गस्त घालत होते. गोखलेगनर भागातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पवार ठाणे जिल्ह्यात नाव बदलून वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस कर्मचारी बाळू गायकवाड, महेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक ठाण्याला रवाना झाले. पोलिसांना पाहताच पवार पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. तो छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव भागात नाव बदलून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याला चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person absconding for seven years arrested in murder case action of the crime branch in thane pune print news rbk 25 ssb