पुणे : लाडकी बहीण योजनेतील बँक खात्याची कागदपत्रे पडताळणीवरुन बँक व्यवस्थापकाला धक्काबुक्की करून गोंधळ घालणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. हडपसर भागातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत ही घटना घडली.

गणेश मधुकर होले, निखिल संजय मुळीक, अक्षय अनिल रासकर (तिघे रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बँक व्यवस्थापकांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश, निखिल, अक्षय हे घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या खासगी कंपनीत कामाला आहेत. गणेशच्या पत्नीने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. तिचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत खाते आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्याची पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. गणेश कागदपत्रे घेऊन बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गेला होता. त्यावेळी बँकेत गर्दी होती.

हेही वाचा – पाषाण टेकडीवर महाविद्यालयीन तरुणाला लुटणारे गजाआड; अल्पवयीन ताब्यात

हेही वाचा – विधी महाविद्यालय रस्त्यावरील सोसायटीत चंदन चोरी, चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढीस

खाते पडताळणी संदर्भातील कागदपत्रे तातडीने जमा करण्यात यावीत, असा आग्रह गणेशने धरला. बँकेत गर्दी असल्याने बँक व्यवस्थापकांनी त्याला रांगेत थांबण्यास सांगितले. या कारणावरुन त्याने बँक व्यवस्थापकांशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर गणेश बँकेतून बाहेर आला. त्याने साथीदार निखिल, अक्षय यांना बोलावून घेतले. बँकेत गोंधळ घालून त्यांनी शाखा व्यवस्थापकांना शिवीगाळ केली, तसेच धक्काबुक्की केली. पसार झालेल्या तिघांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करत आहेत.