पुणे : डेटिंग ॲपवर झालेली ओळख व्यावसायिकाला महागात पडली. व्यावसायिकाला धायरी भागातील निर्जन ठिकाणी बोलावून शस्त्राच्या धाकाने लुटण्यात आले. नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन एका तरुणासह अल्पवयीन साथीदारांना पकडले. याप्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. धायरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती. ही घटना १४ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास धायरीतील डीएसके विश्व परिसरातील एका शाळेजवळ घडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक आणि आरोपीची एका डेटिंग ॲपवरुन ओळख झाली होती. आरोपी धिंडलेने व्यावसायिकाशी ओळख वाढवून त्याला १४ जानेवारी रोजी धायरीतील डीएसके विश्व रस्त्यावर बोलाविले होते. व्यावसायिक तेथे गेला. त्याला धिंडले आणि त्याच्याबरोबर तीन अल्पवयीन साथीदारांनी शस्त्राचा धाक दाखविला. त्याच्याकडील सोन्याची बाळी, मोबाइल संच आणि रोकड असा मुद्देमाल लुटून चौघे जण पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

धायरी परिसरात डीएसके विश्व रस्त्यावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत, असा संदेश समाज माध्यमातून प्रसारित झाला होता. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या भागातील गस्त वाढविली होती. व्यावसायिकाला लुटणारा आरोपी धिंडले तेथे थांबला होता. गस्त घालणारे पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला आणि अक्षय जाधव यांनी त्याला पाहिले. सापळा लावून त्याला पोलिसांनी पकडले. चैाकशीत धिंडले आणि साथीदारांनी १४ जानेवारी रोजी व्यावसायिकाला लुटल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदडे सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, प्रशांत काकडे, मोहन मिसाळ यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Person arrested for robbing a businessman through dating app pune print news rbk 25 ssb