लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी कर्वेनगर भागातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
कुणाल सचिन घावरे (वय २८, रा. बराटे कॉलनी, कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कर्वेनगर भागात वारजे माळवाडी आणि गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर घावरे थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रतीक मोरे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. घावरे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पिस्तूल का बाळगले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त गणेश इंगळे, कोथरूड विभागाचे सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक रंगराव पवार, पोलीस निरीक्षक नीलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नरळे, विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार यांनी ही कामगिरी केली.