वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचे रुप पार बदलून पूर्वीचे पुणे हरवल्याची तक्रार नेहमी केली जाते. परंतु शहरीकरणाबरोबरच वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पुण्यातील आणखीही बरेच काही हरवत चालले आहे. प्रदूषणाचे प्राण्यापक्ष्यांच्या प्रजातींवर होणारे परिणाम चटकन लक्षात येत नसले तरी काळाबरोबर ते होतच असल्याचा एक लहानसा पण लक्षणीय पुरावा समोर आला आहे. पुण्यातील नद्यांचे मैलापाणी वाहून नेणारे नाले झाल्यापासून नदीच्या परिसंस्थेवर जगणाऱ्या आणि पूर्वी केवळ पुण्यातच सापडणाऱ्या ‘पेशवा बॅट’ नावाच्या वटवाघळांच्या प्रजातीने आता शिरूर आणि लोणावळ्याकडे स्थलांतर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘मायोटिस हॉर्सफिल्डी पेशवा’ या शास्त्रीय नावाने ओळखले जाणारे हे वटवाघूळ १९९५ पर्यंत केवळ पुण्यातच सापडत असे. ही वटवाघळे पाकोळीपेक्षा थोडी मोठी असून त्यांचे पंख उघडून मोजल्यास ते साधारणपणे १५ सेमी. भरतात. मुळा- मुठा नदीवरील पूल, जुनी मंदिरे, जुन्या इमारती या ठिकाणी ती प्रामुख्याने आढळत असत. पाण्याच्या परिसंस्थेजवळ राहणारी ही वटवाघळे ‘वॉटर बॅट’ प्रकारात मोडतात. पाण्याजवळचे कीटक खाऊन जगणारी ही प्रजाती पाण्याच्या परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत असे. १९९० नंतर त्यांची निवासस्थाने कमी होत गेल्यामुळे त्यांची संख्या कमी होऊ लागली. आता तर ती पुण्यात अजिबातच सापडत नाहीत.
वटवाघळांचे अभ्यासक डॉ. महेश गायकवाड म्हणाले, ‘‘पुण्यातील नद्या जशा प्रदूषित होत गेल्या तसा पाण्याच्या परिसंस्थेवर ताण पडत जाऊन त्या लोप पावू लागल्या. परिसंस्थेतील नैसर्गिक खाद्य संपत गेल्यामुळे पेशवा वटवाघळे हळूहळू पुण्यातून नाहिशी झाली. स्वच्छ पाण्यात डासांची पैदास खूप मोठय़ा प्रमाणावर आढळत नसल्यामुळे पेशवा वटवाघळांच्या खाद्यात डासांचा समावेश नव्हता. प्रदूषित परिसंस्थेत डासांचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे पेशवा वटवाघळांची जागा आता डासांवर पोट भरणाऱ्या ‘पिपिस्ट्रेल’ वटवाघळांनी घेतली. त्यांची संख्या झपाटय़ाने वाढत असून पुण्यात सध्या पिपिस्ट्रेल वटवाघळांच्या ५-६ प्रजाती सापडतात. ही वटवाघळे अगदी २०-३० ग्रॅम वजनाची, हाताच्या अंगठय़ापेक्षा थोडीशी मोठी असतात. बोली भाषेत त्यांनाच ‘पाकोळी’ म्हणतात. घराबाहेरच्या कपारी, स्वच्छतागृहांचे पाईप्स अशा कुठल्याही जागेत या पाकोळ्या घरोबा करतात.’’
पेशवा वटवाघळांनी आपली राहण्याची जागा आता बदलली आहे. पुण्यातून नाहिशी झालेली ही वटवाघळे २००४ पासून लोणावळा आणि शिरूरमध्ये पाच- सहा जागांवर सापडू लागल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘२०११ ला केलेल्या पाहणीतही शिरूर व लोणावळ्यात पेशवा वटवाघळे दिसली होती. शिरूर कोरडा भाग असल्यामुळे या पूर्वी तिथे ही वटवाघळे कधीच आढळत नव्हती. शिरूरमध्ये सिंचनसुविधा वाढल्यानंतर तिथे पाण्यावरील कीटकांचे प्रमाण वाढून पेशवा वटवाघळे सापडू लागली.’’

‘नदी नव्हे.. मैलापाणी वाहून नेणारे नालेच!’
पुण्यातील नद्यांचा १९८० च्या दशकाच्या शेवटापासून झालेला प्रवास ‘जलदिंडी’ चे प्रवर्तक डॉ. विश्वास येवले यांनी सांगितला. डॉ. येवले म्हणाले, ‘‘सध्याच्या मुळा- मुठा नद्या प्रक्रिया केलेल्या व न केलेल्या मैलापाण्यानेच वाहत आहेत. यातही प्रक्रिया केलेल्या मैलापाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या नद्यांच्या पाण्यात डिर्टजट व घरगुती वापरातील रासायनिक द्रव्यांचे प्रमाण मोठे आहे. १९८० च्या दशकाच्या शेवटी नद्यांच्या आजूबाजूला वसाहती वाढू लागल्या. वाढते शहरीकरण व मैलापाण्याचा चुकीच्या पद्धतीने केलेला निचरा हे नद्यांच्या प्रदूषणामागचे प्रमुख कारण ठरले. नदीत कचरा व गाळ साचून या परिसंस्थेतील गवतासारख्या आवश्यक वनस्पती नष्ट झाल्या. संगमवाडी परिसरात पूर्वी नदीकाठी असलेली शेती नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या किडय़ांसाठी पोषक होती, ती देखील नाहिशी झाली. १९९० नंतर नद्यांत जलपर्णी बेसुमार वाढू लागली. नदीतळाला मिथेन गॅस तयार झाल्यावर तो बुडबुडय़ांच्या स्वरूपात गाळाबरोबर वर येऊन पसरतो. याला ‘ब्लॅक फ्लॉवर’ म्हणतात. पूर्वी ही प्रक्रिया पुण्यात फक्त संगमाच्या ठिकाणी दिसायची. आता ती बंडगार्डनपर्यंत नदीत सगळीकडे दिसते आहे. डासांच्या वाढीच्या चक्रासाठी जलपर्णी खूपच फायदेशीर ठरली आहे.’’
नद्यांच्या परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी यापुढे नवीन विकासाच्या प्रक्रियेत नदीकाठच्या पूररेषेच्या (हाय फ्लड लेव्हल) बाहेर ५० ते १०० फुटापर्यंत हरित पट्टा तयार करावा आणि या पट्टय़ात नदीकाठची नैसर्गिक परिसंस्था वाढू द्यावी, असा उपायही डॉ. येवले यांनी सुचवला.

Story img Loader