ट्रकमधील सळई निसटून पाठीमागून येणाऱ्या मोटारीतील प्रवाशाच्या छातीमध्ये आरपार घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी मरकळ रस्त्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला.
रामदास दत्तात्रेय रणसिंग (वय ५५, रा. निमगाव म्हाळुंगे, ता. शिरूर) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक सेवाराम शिवाराम (रा. चितावा, ता. नावा, जि. नागूर, राजस्थान) याला अटक केली आहे. मरकळ रस्त्यावरील कारलाईन कंपनीसमोर सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकमधील सळया सैल होऊन अचानक ट्रकमधून निसटल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या मोटारीवर त्या सळया आदळल्या. त्यातील एक सळई मोटारीची काच फोडून मोटारचालकाच्या शेजारी बसलेल्या रणसिंग यांच्या छातीमध्ये आरपार गेली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हलगर्जीपणाने वाहनात सामानाची वाहतूक केल्याप्रकरणी ट्रकचालक सेवाराम याला अटक केली आहे.