माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे पाळीव प्राणी! हेच पाळीव प्राणी आजारात आराम पडावा यासाठीही मदत करत आहेत. गेल्या वर्षभरात (२०१४) पुणे आणि मुंबईत मिळून १२० रुग्णांच्या समुपदेशन उपचारांमध्ये पाळीव प्राण्याचे साहाय्य घेण्यात आले आहे. ‘अ‍ॅनिमल एंजल्स’ या संस्थेच्या संचालक मीनल कविश्वर यांनी ही माहिती दिली. या उपचारांचा फायदा झालेल्यांमध्ये अडीच वर्षांपासून अगदी १६ ते २५ या वयोगटातील मुलांचाही समावेश असल्याचे त्या म्हणाल्या.
संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रशिक्षण कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी’तील प्रसिद्ध समुपदेशक डॉ. सिंथिया के. चँडलर नुकत्याच पुण्यात येऊन गेल्या. या निमित्ताने मीनल यांनी या उपचारांबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘लहान मुलांच्या विकासाशी निगडित असलेल्या सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझम या समस्यांमध्ये पाळीव प्राण्यांच्या साहाय्याने केलेल्या समुपदेशन उपचारांचा उपयोग होतो. मुलांच्या वर्तणुकीसंबंधीच्या समस्या, पौगंडावस्थेतील मुलांच्या भावनिक गुंतागुंतींपासून मोठय़ांचे ताणतणाव, कर्करुग्णांची भावनिक घालमेल याबाबतीतही पाळीव प्राणी मदत करू शकतात. आम्ही प्रामुख्याने प्रशिक्षित कुत्र्यांची उपचारांमध्ये मदत घेतो. पण मांजरी, ससे आणि मासे यांचीही मदत होऊ शकते.’’
रुग्णाबद्दल आपली कोणतीही मते व्यक्त न करता पाळीव प्राणी त्यांना आपलेसे करतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या जवळ रुग्ण आपले मन मोकळे करू शकतो आणि त्यामुळे तो त्याच्या मूळ वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद देऊ शकतो, अशी ही संकल्पना असल्याचेही मीनल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘संभाषणात अडचणी असणाऱ्या एखाद्या लहान मुलाला प्रशिक्षित पाळीव कुत्र्यासमोर मन मोकळे करू दिले जाते. आपण बोलताना अडखळलो किंवा चुकलो तरी कुत्रा आपल्याला हसत नाही, आपल्या बोलण्यावर काही नकारात्मक भाष्य करत नाही या जाणिवेमुळे मुलांना स्वत:च्या गतीने आणि उत्स्फूर्तपणे संभाषण करण्याची प्रेरणा मिळते. माझ्या अनुभवानुसार संभाषणातील अडचणींमुळे न बोलणाऱ्या मुलांच्या उपचारांमध्ये त्यांनी उच्चारलेला पहिला शब्द म्हणजे ‘थेरपी डॉग’चे नावच असते.’’