लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बचत गटाच्या थकीत पैशाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका ४० वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, ज्योती रघुनाथ शिर्के (वय ४२) आणि तिचा पुतण्या मिहीर शिर्के (वय २५, दोघे रा. गांधीनगर येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पिंपरी : पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ २९४ मिमी पाऊस; पाणीकपातीबाबत आयुक्त म्हणाले…

तक्रारदार महिला बचत गटातील थकीत रक्कम मागणी करण्यासाठी आरोपी ज्योती शिर्के हिच्या घरी रविवारी (३० जून)सकाळी पावणेनऊच्या सुमारास गेली होती. थकीत पैसे मागितल्याने शिर्के आणि तिचा पुतण्या मिहीर यांनी महिलेला शिवीगाळ, तसेच दमदाटी केली. आरोपींनी त्यांच्या घरातील पाळीव श्वान महिलेच्या अंगावर सोडले.

श्वानाने महिलेच्या उजव्या हाताचा तीन ते चार वेळा चावा घेतला. श्वानाच्या चाव्यामुळे हात रक्तबंबाळ झाला. महिलेने आरोपी शिर्के यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली. तेव्हा आरोपींनी महिलेला मदत न करता घराचा दरवाजा आतून बंद केला. पाळीव श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येरवडा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.