उंबऱ्याबाहेर राखणदार म्हणून असलेले श्वान घरातील सदस्य झाल्यानंतर प्रत्येक नियोजनात त्यांचा विचार होऊ लागला आहे. अगदी घरातील कार्यक्रम असो किंवा मोठी सहल, ‘पेट फ्रेंडली सव्‍‌र्हिसेस’चा पालकांकडून आवर्जून शोध घेतला जातो. त्यातीलच एक भाग पर्यटनाचा. प्राण्यांना घेऊन पर्यटन करण्याचा ट्रेंड गेल्या पाच, सहा वर्षांपासून प्राणिपालकांमध्ये पसरला आहे. ही गरज भागवण्यासाठी अर्थातच ‘पेट फ्रेंडली हॉटेल्स’ची मोठी साखळी जगभरात कार्यरत आहे. खासगी रिसॉर्ट, क्लब्ज येथेही आवर्जून पाळीव प्राण्यांसाठी विविध सुविधा पुरवल्या जातात.

पेट फ्रेंडली हॉटेल्सची संकल्पनाही मूळची परदेशी. त्याचे उगमस्थान कोणते याच्या नोंदी नसल्या, तरी अगदी पूर्वीपासून पाळीव प्राण्यांना घेऊन प्रवास करण्याची पद्धत युरोप आणि अमेरिकेत आहे. दळणवळणाची पुरेशी साधने नव्हती, रेल्वे नुकतीच सुरू झाली होती, तेव्हापासून प्राण्यांना घेऊन माणसाचे पर्यटन सुरू आहे. साधारण गेल्या दहा ते पंधरा वर्षांत जगभरात पाळीव प्राण्यांना सुविधा देणारी बाजारपेठ बहरली आणि त्यातीलच एक भाग असलेल्या पाळीव प्राण्यांसह राहण्याचा आनंद घेता येईल अशी हॉटेल्स उभी राहिली. भारतात परदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत गेले आणि त्याबरोबरच प्राण्यांसह पर्यटनाचा आनंद घेण्याची मागणी वाढू लागली. हळूहळू भारतातही ‘पेट फ्रेंडली’ हॉटेल्स उभी राहिली. येथील पंचतारांकित मोठय़ा हॉटेल्सनीही प्राण्यांना सामावून घेतले. त्यांच्यासाठीही तारांकित सुविधांचा पुरवठा सुरू केला.

पेट फ्रेंडली हॉटेल्सचे वेगळेपण काय?

अर्थातच आपल्या पाळीव प्राण्याला बरोबर घेऊन येथे राहता येते, आपल्याबरोबर प्राण्यालाही दूरदेशीची भ्रमंती घडवून आणता येते, हे या सेवेचे मूळ वेगळेपण. यातील अनेक हॉटेल्समध्ये प्राण्यांसाठी वेगळे खाणे पुरवले जाते. त्यांना फिरवून आणण्याची सुविधा दिली जाते. खोलीत साधारणपणे प्राण्यांसाठी झोपण्याची सोय, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, नखं घासण्यासाठी जागा (स्कॅचिंग पोस्ट) अशा सुविधा असतात. हॉटेलच्या परिसरात प्राण्यांना घेऊन फिरण्यासाठी वेगळे मार्ग आखून दिलेले असतात. स्पा, पार्लर यांचीही सुविधा असते. एखाद्या ठिकाणी प्राण्यांना नेता येण्यासारखे नसेल, तर तेवढय़ा वेळात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी पाळणाघरही असते. प्राण्यांना खेळवण्यासाठी कर्मचारी असतात. गरज असेल तर वैद्यकीय सेवा तत्काळ पुरवली जाऊ शकते. साधारणपणे या सुविधा पुरवल्या जात असल्या तरी प्रत्येक हॉटेलनुसार त्यात फरक असतो.

काळजी काय घ्यावी?

‘पेट फ्रेंडली हॉटल्स’ अशी ओळख असली, तरी नोंदणी करण्यापूर्वी खात्री करून घेणे आवश्यक आहे. विशेषत: ऑनलाईन बुकिंग करताना हॉटेलशी संपर्क साधून चौकशी करून घ्यावी. काही हॉटेलमध्ये खाणे पुरवले जात नाही किंवा पुरवले जाणारे खाणे प्राण्याच्या सवयीचे, आवडीचे नसते. त्यासाठी बरोबर थोडे खाणे, च्यूस्टिक्स कायम ठेवाव्यात. प्राण्यांसाठी वेगळे दर आकारण्यात येतात का, असल्यास कसे त्याची आधी चौकशी करावी. त्याचप्रमाणे कोणत्या सुविधा अतिरिक्त शुल्क घेऊन पुरवल्या जातात आणि कोणत्या सुविधा मोफत आहेत, त्याचीही माहिती घ्यावी. काही हॉटेल्समध्ये कुत्र्याच्या काही प्रजातींना किंवा खूप मोठय़ा प्रजातींना बंदी असते. त्या अनुषंगाने आपल्या घरातील श्वानाची प्रजाती हॉटेलमध्ये चालेल का हे पाहणे आवश्यक असते. प्राण्याला खोलीत ठेवण्यात येणार आहे की त्याच्यासाठी वेगळे पिंजरे करण्यात आले आहेत त्याचीही माहिती घ्यावी. दुसऱ्या ठिकाणी प्राण्याला नेताना कायम बरोबर पुरेसे पिण्याचे पाणी ठेवावे. सुरूवातीला प्राण्याच्या सवयीचे पाणी द्यावे, त्यानंतर हळूहळू स्थानिक पाण्यात घरातील पाणी मिसळून द्यावे. प्राणी ओरडल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. प्राण्यांना शक्यतो एकटे खोलीत ठेवून बाहेर जाऊ नये. त्याचबरोबर त्यास जीपीएस कॉलर असणे आवश्यक आहे.

भारतात कुठे कुठे?

भारतात दिल्ली, आग्रा, केरळ, चेन्नई, हिमाचल प्रदेश, नैनिताल, सिक्कीम, राजस्थान, गुजराथ, गोवा अशा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बहुतेक ठिकाणी पेट फ्रेंडली हॉटेल्स आहेत. याशिवाय बंगळुरू, मुंबई, पुणे, हैदराबाद या बिझिनेस डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणीही पेट फ्रेंडली हॉटेल्सची सुविधा मिळू शकते. मेरिएट, विवांता, ओकवूड ही आणि अशी बहुतेक तारांकित हॉटेल्स ही सुविधा पुरवतातच, मात्र मध्यम दर्जाच्या अनेक हॉटेल्सनीही प्राणिप्रेमाचे धोरण स्वीकारले आहे.

Story img Loader