पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ काही दिवसांपासून थांबली असली, तरी सीएनजीच्या दरातील वाढ मात्र दीड महिन्यांपासून कायम आहे. पुणे शहरात सीएनजीच्या दरात शनिवारपासून (२१ मे) किलोमागे २.८० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शहरात सीएनजीचा दर ८० रुपये किलो झाला आहे. गेल्या सुमारे दीड महिन्यात सीएनजी तब्बल १८ रुपयांनी महागला आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर काही दिवसांपासून उच्चांकी पातळीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यात वाढ किंवा कपात झालेली नाही. पुण्यात सध्या पेट्रोल १२० रुपये, तर डिझेलचे दर १०२ रुपयांच्या पुढे आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून आता सीएनजीची दरवाढ सुरू आहे. ३१ मार्चला ६८.५० रुपये असलेला सीएनजीचा दर राज्य शासनाने करात कपात केल्यानंतर ६२.२० रुपयांवर आला होता. मात्र, ५ एप्रिलला लगेचच त्यात वाढ होऊन तो ६८ रुपयांवर पोहोचला होता. आठवड्यानंतर लगेचच दरात आणखी वाढ झाली असून, १३ एप्रिलपासून शहरात सीएनजी ७३ रुपये किलो झाला होता. त्यात २० एप्रिलला दोन रुपयांची वाढ होऊन दर ७५ रुपयांवर गेले. २९ एप्रिलला पुन्हा २.२० रुपयांची दरवाढ झाल्याने किलोमागे सीएनजीचा दर ७७.२० रुपयांवर पोहोचला होता. २२ दिवसांच्या कालावधीनंतर त्यात पुन्हा २.८० रुपयांची वाढ झाली असून, २१ मेपासून शहरात सीएनजीचा दर ८० रुपये किलो झाला आहे.
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ सीएनजीचीही दरवाढ!
शहरातील सर्व रिक्षा सध्या सीएनजी इंधनावर चालवल्या जातात. पीएमपीच्या अनेक बसही याच इंधनावर धावतात. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असल्याने अनेक खासगी मोटारीही गेल्या काही दिवसांत सीएनजीवर परिवर्तित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची खरेदीही वाढली आहे. मात्र, आता पेट्रोल, डिझेलपाठोपाठ सीएनजीचीही सातत्याने दरवाढ सुरू असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.