राज्य शासनाचा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश नसताना कॅन्टोन्मेंट विभागात पेट्रोल पंपांच्या माध्यमातून एलबीटीची (स्थानिक संस्था कर) वसुली केली जात आहे. एलबीटी बंद झाल्यास पुण्यासह खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विभागामध्ये पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी, तर डिझेल १.४० रुपयांनी स्वस्त होऊ शकणार आहे, अशी माहिती पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कॅन्टोन्मेंट विभागात असलेल्या पेट्रोल पंपांकडून पेट्रोलियम कंपन्यांकडून पालिकेत जमा करण्यासाठी एलबीटी घेतला जातो. १ एप्रिल २०१३ पासून हा कर लावण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट विभागात एलबीटी वसूल करण्याबाबत राज्य शासनाचा कोणताही आदेश नाही, असे दारुवाला यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला असून, पालिकेकडून नुकतेच त्यांना एक पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक कर नियम ९ (३) अनुसार व्हॅट नोंदणीधारक हे स्थानिक कराचे डिम्ड नोंदणीधारक असल्याने पालिकेच्या हद्दीबाहेर असणाऱ्या व्हॅट नोंदणीधारकांनाही स्थानिक संस्था नोंदणी क्रमांक दिला आहे. मात्र, या नोंदणीधारकांनी स्थानिक संस्था कर भरू नये, यासाठी अशा पेट्रोल पंप चालकांचे नोंदणी क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत.
हद्दीबाहेरच्या पेट्रोल पंप चालकांच्या पेट्रोल व डिझेलवरील एलबीटीबाबत पालिकेने स्पष्टीकरण केले असतानाही एलबीटी घेतला जात असल्याने कॅन्टोन्मेंट विभागातील नागरिकांना इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत, असे दारुवाला यांनी सांगितले. पालिकेच्या पत्रामध्ये एलबीटी भरू नये, असे स्पष्ट असताना हिंदूुस्थान पेट्रोलियम कंपनीने आपले एलबीटी खाते काढून कर जमा केला आहे. त्यामुळे मी आतापर्यंत भरलेली रक्कम मला परत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कॅन्टोन्मेंट विभागातील पंपांसाठी एलबीटी हटविल्यास पुणे कॅन्टोन्मेंटमधील पाच, खडकीतील दोन, तर देहूरोड येथील एका पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल व डिझेल महापालिका क्षेत्राच्या तुलनेत कमी दरात मिळू  शकणार आहे, असेही दारुवाला यांनी स्पष्ट केले.

Story img Loader