लोणी काळभोर येथील तेल कंपनीच्या फिलिंग स्टेशनमधून टँकरची मास्टर की चोरीस गेल्याची गेल्या काही वर्षांतील ही तिसरी घटना घडली असून यामागे तेलमाफियांचा हात असल्याचा आरोप असून पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी मंगळवारी केला. आता कंपनीने ही कुलूप यंत्रणा स्वखर्चाने बदलून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, संबंधित कंपनीकडून ‘खरेदी बंद’ (नो परचेस) आंदोलन सुरू करण्यासंदर्भात बुधवारी (११ जून) लष्कर परिसरातील इस्कॉन मंदिरासमोरील न्यू क्लब येथे दुपारी चार वाजता होणाऱ्या असोसिएशनच्या सभासदांच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार असल्याचे बाबा धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तेल कंपन्यांशी झालेल्या ‘मास्टर डिसिप्लिन गाइडलाइन्स’प्रमाणे या निष्काळजीपणासाठी दोषी असलेल्या व्यक्तींवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले.
बाबा धुमाळ म्हणाले, लोणी काळभोर परिसरात तीन तेल कंपन्यांची फिलिंग स्टेशन्स आहेत. त्यापैकी एका कंपनीच्या फिलिंग स्टेशनमधून पेट्रोल आणि डिझेलच्या टँकरची मास्टर की चोरीला गेली आहे. टँकरच्या कुलपाची एक किल्ली पेट्रोल पंपमालकाकडे तर दुसरी किल्ली इंधन भरून देणाऱ्या फिलरकडे असते. सर्व टँकरचे कुलूप उघडणारी मास्टर की चोरीस गेली आहे. तीन हजार रुपयांना किल्ली विकली जाते अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीचे कुलूप असलेल्या इंधनाचा देशभरातील कोणताही टँकर उघडता येऊ शकतो. इंधनामध्ये भेसळ केली जाऊ शकते किंवा इंधनाची चोरीही होऊ शकते. अशा घटनांमुळे प्रत्येक टँकरमागे २५ ते ३० लिटर पेट्रोल आणि ५० ते ६० लिटर डिझेल कमी मिळते. त्यामुळे या कंपनीच्या इंधनाचे टँकर आम्ही स्वीकारणार नाही. पेट्रोल डिलर आगाऊ रक्कम अदा करतो. त्यामुळे टँकर डिलरकडे आणण्याची जबाबदारी ही कंपनीची असते. गेल्या वेळी टँकरचे ४५० कुलपे नव्याने बसवून घेण्यात आली आहेत. त्यासाठी ३५ हजार रुपये खर्च आम्ही केला आहे. त्यामुळे आता कंपनीने स्वखर्चाने कुलूप यंत्रणा बदलून दिली पाहिजे.