पेट्रोल ९०.१०, तर डिझेल ७७.२० रुपये लिटर

मागील दहा ते बारा दिवसांपासून प्रतिलिटर ८९ रुपयांच्या आसपास असलेले पुण्यातील पेट्रोलचे दर अखेर नव्वदीपार गेले. इंधन दराच्या या भडक्याने सर्वसामान्यांना धडकी भरवली आहे. शहरामध्ये २४ सप्टेंबरला पेट्रोलचे प्रतिलिटर दर ९०.२० रुपये, तर डिझेलचे दर ७७.२५ रुपये होते. १ सप्टेंबरपासून मागील २४ दिवसांमध्ये पेट्रोलचे दर सुमारे साडेतीन रुपयांनी, तर डिझेलचे दर सुमारे चार रुपयांनी वाढले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे १२ आणि १६ रुपयांनी अधिक आहेत.

एकटय़ा पुणे शहरामध्ये दररोज ३५ लाख लिटर पेट्रोल, तर ५६ लाख लिटर डिझेलची विक्री होते. इंधनाच्या विक्रीमध्ये राज्यात मुंबईनंतर पुणे शहर आघाडीवर आहे. शहरात लोकसंख्येपेक्षाही वाहनांची संख्या अधिक आहे आणि ती झपाटय़ाने वाढत असल्याने इंधनाच्या विक्रीतही मोठी वाढ होत आहे. यंदाच्या मे महिन्यामध्ये पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा उच्चांक झाला होता. या कालावधीत पेट्रोल ८६ रुपयांपर्यंत, तर डिझेलचा दर ७२.५० रुपयांपुढे पोहोचला होता. मात्र, इंधनाच्या सध्याच्या दरांनी सर्व मे महिन्यातील उच्चांकासह दराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

शहरात २०१० मध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर अवघे ५० ते ५२ रुपये होते. २०१४ मध्ये त्यात २० रुपयांची वाढ नोंदविली जाऊन पेट्रोल ६० रुपयांच्या आसपास पोहोचले. २०१७ मध्ये ८० रुपयांचा उच्चांक केला, तर सध्या २०१८ मध्ये दरांचे सर्व उच्चाक मोडीत काढत पेट्रोलच्या दराने ९० रुपयांपुढे उसळी घेतली आहे. मागील अवघ्या एकाच महिन्यामध्ये पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची, तर डिझेलच्या दरामध्ये सुमारे साडेपाच रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. इंधनाच्या या वाढीमुळे दुचाकीसह खासगी वाहने वापरणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक फटका बसतो आहे. त्याचप्रमाणे प्रवासी आणि माल वाहतुकीतील व्यावसायिकांचे गणितही कोलमडत असून, पुन्हा एकदा माल आणि प्रवासी भाडय़ाच्या दरवाढीचे संकेत दिले जात आहेत.

इंधनाचे दर आता स्थिर राहतील

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून लिटरमागे २ ते १० पैशांनी वाढ होत आहे. पेट्रोलचे दर नव्वदपर्यंत जाण्याचे संकेत होते. मात्र, यापुढे दरांमध्ये फार मोठी वाढ न होता ते स्थिर राहतील.     – अली दारूवाला, ऑल इंडिया पेट्रोल डीलर असोसिएशन प्रवक्ता