स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि व्हॅटच्याविरोधात राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी मंगळवारपासून पुकारलेला बेमुदत संप सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आला.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत तावडे यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी ही घोषणा केली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ११ ऑगस्टला पेट्रोल डिलर्स असोसिएशनने ३ दिवसांचा लाक्षणिक संप पुकारला होता, परंतु, त्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केल्यानंतर असोसिएशनने मंगळवारपासून बेमुदत संप करण्याची घोषणा केली होती. बेमुदत संपाचा इशारा दिल्यानंतरही गेल्या ५ दिवसांत सरकारने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही अथवा कोणत्याहीप्रकारे त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे असोसिएशनने संपाचा निर्णय घेतला होता. परंतु, तावडे यांनी यासंदर्भात असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विधीमंडळ सदस्य आणि फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांची समिती नेमून यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, तसेच व्हॅटचा दर कमी करण्याचे आणि एलबीटी रद्द करून पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याबाबत महायुतीच्यावतीने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन पेट्रोल -चालकांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे तावडे यांनी सांगितले.