पुणे : पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एकाने दोन कोटी ६३ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लेखापरीक्षणात अपहाराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नितीन रामचंद्र रायपुरे (वय ५२, रा. घोरपडे वस्ती, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत पेट्रोल पंप मालक अक्षय बाळकृष्ण काळे (वय ३६, रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांचा कुंजीरवाडी परिसरात ॲटोकाॅर्नर पेट्रोल पंप आहे. रायपूरे त्यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून कामला होता.

पेट्रोल पंपाची जबाबदारी काळे यांचे वडील सांभाळायचे. त्यानंतर पंपाची जबाबदारी अक्षय काळे यांच्यावर सोपविण्यात आली. काळे यांच्या वडिलांचे अन्य व्यवसाय होते. त्यामुळे त्यांना पंपावरील व्यवहारांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ व्हायचा नाही. पेट्रोल पंपावरील व्यवस्थापक रायपुरे यांच्याकडे विश्वासाने पंपाची जबाबदारी सेपविण्यात आली होती. २०१८ ते २०२४ या कालावधीत त्यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेल्या दोन कोटी ६३ लाख रुपयांचा अपहार केला.

पेट्रोल पंपावरील इंधनाची विक्री नियमित व्हायची. मात्र, उत्पन्नातील तूट वाढत चालल्याचे पेट्रोल पंप मालक अक्षय काळे यांच्या निदर्शनास आले. पंपावरील व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्यात आले. तेव्हा पंपावर जमा झालेल्या रक्कमेचा अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले. पंपावरील व्यवस्थापक रायपुरे यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत अपहाराचा प्रकार उघडकीस आला. रायपुरेने पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड स्वत:च्या खात्यात वळविल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. तकार अर्जावरुन रायपुरे यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रायपुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार तपास करत आहेत.