पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नऱ्हे भागात घडली होती. खून प्रकरणात गेले दोन महिने पसार असलेल्या नऱ्हेतील माजी उपसरपंचाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी नऱ्हे गावचा माजी उपसरपंच सुशांत कुटे याला अटक करण्यात आली. यापूर्वी खून प्रकरणात गौरव संजय कुटे (वय २४), अजिंक्या चंद्रकांत गांडले (वय २०), राहुल सोमनाथ लोहार (वय २३, तिघे रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांना अटक करण्यात आली होती. पेट्रोल चोरीच्या संशयातून आरोपींनी समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव काॅलेज रस्ता, नऱ्हे) याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला होता. याबाबत समर्थचे वडील नेताजी (वय ५१, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

नेताजी एका कंपनीत वाहनचालक आहेत. त्यांचा मुलगा समर्थ खासगी कंपनीत कामाला होता. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास समर्थला आरोपींनी पेट्रोल चोरीच्या संशयातून आरोपी कुटे, गांडले, लोहार यांनी बेदम मारहाण केली. समर्थने वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली होती. नेताजी तेथे पोहोचले. त्यावेळी समर्थ जखमी अवस्थेत तेथे पडला होता. तेथे नागरिकांची गर्दी झाली होती. त्यांनी समर्थला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या समर्थचा मृत्यू झाला.

खून प्रकरणात सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. नऱ्हे गावाचा माजी उपसरपंच सुशांत कुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. पसार झालेल्या आरोपी सुशांतला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी ही कारवाई केली.