प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील (आरटीओ) पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडणाऱ्या यंत्रामध्ये शॉर्टसकिट होऊन आग लागली. मात्र, येथील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी तत्काळ पंपाचा वीज पुरवठा खंडीत करत ‘फायर ड्राय केमिकल’ चा वापर करून आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आरटीओसमोर भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास या पेट्रोल पंपाच्या नऊ आणि दहा क्रमांकाच्या पेट्रोल सोडणाऱ्या यंत्रामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. पंपावरील कर्मचाऱ्यांनी येथील वीज पुरवठा बंद केला आणि अग्निशामक दलास फोन केला. तसेच, फायर ड्राय केमिकलचा वापर करून आग विझवली. नायडू अग्निशामक केंद्रापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर हा पंप असल्याने काही मिनिटांमध्ये अग्निशामक गाडी पोहोचली. मात्र, तोपर्यंत येथील कर्मचाऱ्यांनी आग विझवली होती, अशी माहिती नायडू अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुनील भिलारे यांनी दिली. येथील कर्मचारी प्रशिक्षित असल्यामुळे मोठा अनर्थ टळला.