दीड महिने आधीपासूनच ‘योग दिना’चा उत्साह
गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या ‘योग दिना’चा उत्साह टिकवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाने आतापासून प्रयत्न सुरू केले आहेत. ‘योगअभ्यास’ या विषयातही आता पीएच.डी करता येणार आहे, तर शालेय स्तरासाठी यावर्षीपासून ‘योग ऑलिम्पियाड’ सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षीपासून २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीही ‘योग दिना’चा उत्साह टिकवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवे उपक्रम, योजना राबवल्या जात आहेत. योगअभ्यासाचा प्रसार करण्यासाठी आता योग या विषयातील पीएचडी अभ्यासक्रमालाही विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिली आहे. या अभ्यासक्रमासाठी परदेशी विद्यार्थ्यांना ‘आयुष’ मंत्रालयाकडून अभ्यासवृत्तीही देण्यात येणार आहे. योग दिनाची तयारी सुरू करण्याच्या सूचना आयोगाने विद्यापीठांना दिल्या असून विद्यापीठांनी आपले उपक्रम, योजना आयोगाला कळवायच्या आहेत. ‘योगअभ्यासाचा’ प्रसार करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिल्या आहेत. यावर्षीपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘योग ऑलिम्पियाड’ सुरू करण्यात येणार असल्याचेही मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षण मंडळ आणि विविध राज्यातील मंडळांसाठी ही स्पर्धा असणार आहे.