भागीदारीतील शोधनिबंधकांना पदवी ‘वाटप’

अभ्यासकष्टांच्या परिपाकातून नावाआधी ‘डॉक्टर’ लावू देणारी पीएच.डी पदवी मिळवण्यासाठी एकच शोधनिबंध पाच-सहा जणांनी मिळून लिहायचा; मग सगळ्यांनी तोच आपापल्या पीएच.डी प्रबंधासाठी उतरवून काढायचा. भागीदारीतून अभ्यास बनावाच्या या प्रकाराला डोळेझाक करीत मान्यता द्यायची, असा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डीचा नवाच भ्रष्टाचार समोर आला आहे. फक्त शोधनिबंधच नाही, तर विद्यापीठातील एका अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रबंधातील अनेक प्रकरणेही सारखीच आहेत.

पीएच.डीला प्रवेश घेण्यापासून ते प्रत्यक्ष पदवी मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गोंधळ आणि अपप्रकार सुरू आहेत, याविषयी ‘लोकसत्ता’ने ‘नियमभंगाची पीएच.डी’ या वृत्तमालिकेतून गेले वर्षभर पाठपुरावा केला आहे. अनेक वर्षे संशोधनाबाबत अग्रेसर असल्याची पावती मिळालेले पुणे विद्यापीठ पीएच.डीसाठी सुरू असलेल्या प्रबंध चोरीमारीच्या प्रकाराला पाठीशी घालत असल्याचे उघड झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी देण्यासाठी ठरवून दिलेले निकष विद्यापीठाकडून पाळले जात नाहीतच, मात्र तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाऊन प्रबंधातील संशोधन व शैक्षणिक मुद्दय़ांबाबत असलेल्या त्रुटींबाबतही  कानाडोळा करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. याबाबत विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

अपप्रकारांत भागीदारी

नियमानुसार पीएच.डी क रणाऱ्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंध मान्यताप्राप्त शोधपत्रिकेत  प्रसिद्ध होणे आवश्यक असते. विद्यापीठातील एका अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली एकाच कालावधीत पीएच.डी केलेल्या तीन विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या काही शोधनिबंध लिहिले. एक मुख्य लेखक आणि बाकीचे दोन विद्यार्थी आणि मार्गदर्शक हे सहलेखक अशा प्रकारे हे शोधनिबंध लिहिण्यात आले. यातील काही शोधनिबंधांसाठीतर ७ ते ८ लेखक आहेत. भागीदारीत काम करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी पीएच.डीही मिळवल्याचे समोर आले आहे.  हे सामूहिक शोधनिबंध विद्यार्थ्यांनी आपल्या प्रबंधाला जोडले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रबंधातील अनेक प्रकरणे सारखीच आहेत. या प्रकरणांमधील सर्व मुद्दे, उपमुद्दय़ांमधील क्रमवारीतील थोडाफार बदल वगळता उपप्रकरणे, मुद्दे सारखेच आहेत. यातील एकही शोधनिबंध हा विद्यार्थ्यांने एकटय़ाने लिहिलेला नाही. मात्र या सगळ्याकडे डोळेझाक करून मार्गदर्शकांनीही विद्यार्थ्यांचे प्रबंध मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता, सुविधा राखणे हे कर्तव्य असणाऱ्या अधिकाऱ्यांनीच आपल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी दिल्याचे उघड झाले आहे.

एकही शोधनिबंध नाही!

पीएच.डी मिळण्यासाठी किमान दोन शोधनिबंध नामांकित आणि मान्यताप्राप्त शोधपत्रिकेत प्रसिद्ध होणे आवश्यक असते. मात्र, एकही शोधनिबंध प्रसिद्ध झालेला नसतानाही अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून पीएच.डी देण्यात आली आहे.

Story img Loader