स्वच्छतेसाठी घरोघरी रोज वापरले जाणारे फिनाईल योग्य पद्धतीने न हाताळल्यास ते अॅसिडइतकेच धोकादायक ठरू शकत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. ‘फिनाईलच्या दुष्परिणामांची अनेकांना कल्पनाच नसून त्यामुळे ते अगदी निष्काळजीपणे हाताळले जाते. मात्र फिनाईल हाताळताना त्याच्या वाफा हुंगल्या गेल्यास किंवा फिनाईलचा त्वचेशी संपर्क आल्यास ते धोकादायक ठरू शकते,’ असे मत एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
‘हेल्थ इंडिया’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून त्यात पुणे आणि मुंबई येथील एकूण २०० डॉक्टरांनी भाग घेतला. संस्थेच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजिरी चंद्रा, डॉ. शरद आगरखेडकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. चंद्रा म्हणाल्या, ‘‘स्वच्छतेसाठी अॅसिड, फिनाईल आणि ब्लीचिंग पावडर ही जंतुनाशके घरोघरी वापरली जातात. या जंतुनाशकांपासून आरोग्याला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना अधिक धोकादायक आणि कमी धोकादायक असे गुण देण्यास आम्ही डॉक्टरांना सांगितले. या सर्वेक्षणात ८० टक्क्य़ांहून अधिक डॉक्टरांनी अॅसिड आणि फिनाईल आरोग्यासाठी समान प्रमाणातच घातक असल्याचे म्हटले आहे. चुकून फिनाईल पोटात गेल्यास ते घातक ठरू शकते हे बहुतेक जणांना माहीत असते. फिनाईलच्या वाफा हुंगल्यामुळे तसेच फिनाईलचा त्वचेशी तसेच डोळ्यांशी संपर्क आल्यामुळे होऊ शकणारे गंभीर परिणाम नागरिकांना माहीत नसतात’’
फिनाईल हे घरातील रोजच्या वापरातील सर्वात धोकादायक जंतूनाशक असल्याचे मतही ५६ टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
फिनाईल योग्य पद्धतीने वापरले न गेल्यास-
– दीर्घ काळ फिनाईल हुंगले गेल्यास श्वसनमार्गासाठी ते धोकादायक.
– चुकून डोळ्यात गेल्यास दृष्टीवर वाईट परिणाम शक्य.
– त्वचेशी दीर्घकाळ संपर्क आल्यास कर्करोगकारक ठरू शकते.
– फिनाईलचे अंश शरीरात जात राहिल्यास ते यकृत व मूत्रपिंडासाठी घातक ठरू शकते.
काय काळजी घ्यावी?
– फिनाईलला पर्याय ठरणारी काही तुलनेने कमी धोकादायक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.
– स्थानिक उत्पादकांनी बनवलेल्या फिनाईल उत्पादनांवर अनेकदा घटकद्रव्यांचा स्पष्ट उल्लेख नसतो. अशी उत्पादने वापरण्याचे टाळावे.
– दीर्घकाळ फिनाईलचा वापर करावा लागत असेल तर नाकातोंडावर रुमाल किंवा मास्क बांधावा, तसेच रबरी हातमोजे घालावेत.
– फिनाईलच्या बाटल्या सुरक्षित जागीच ठेवा, त्या मुलांच्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये फिनाईल ओतून ठेवू नका.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा