पाणीपुरवठय़ा संबंधीच्या सर्व तक्रारी यापुढे पुणेकरांना फोन, एसएमएस वा ई-मेलद्वारा करता येणार आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर तक्रारीचे निवारण चोवीस तासांत केले जाईल.
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी आणि नंदकिशोर जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेची विविध कार्यालये तसेच कोठय़ा आणि संबंधित अभियंत्यांकडे पाणीपुरवठाविषयक तक्रारी सातत्याने येत असतात. संबंधित अभियंत्यापर्यंत ती तक्रार पोहोचून तिचे निवारण व्हायला वेळ लागतो. पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी नेमक्या कोठे करायच्या याबाबत नागरिकांना योग्य माहिती नसल्याचे सातत्याने लक्षात येत आहे. त्यामुळे यापुढे या तक्रारी करण्यासाठी तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिकेने पाणीपुरवठा विभागाची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार केली असून या प्रणालीमार्फत या तक्रारी स्वीकारल्या जातील, तसेच त्यांचे निवारणही केले जाईल.
महापालिकेच्या पुणेकॉर्पोरेशनडॉटओआरजी या संकेतस्थळावर गेल्यानंतर तेथे पाणीपुरवठा विषयक तक्रारी करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही तक्रार करताना प्रभागाचा क्रमांक किंवा प्रभागाच्या नगरसेवकाचे नाव माहिती असणे आवश्यक आहे. ही तक्रार नोंदवल्यानंतर एसएमएसद्वारे तक्रारीची तत्काळ पोच दिली जाईल. या बरोबरच स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणेमार्फतही तक्रारी करता येणार आहेत. त्यासाठी २५५० ८१७१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागेल. या तक्रारीत तक्रारदाराचे नाव व पत्ता ध्वनिमुद्रित केला जाईल. मोबाईलद्वारे या क्रमांकावर तक्रार केल्यास एसएमएसद्वारे पोच दिली जाईल. खास संगणकप्रणालीमार्फत ही तक्रार संबंधित अभियंत्याकडे पाठवली जाईल.
पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी एसएमएसद्वारे करायच्या असतील तर त्यासाठी ८३०८८ ९५६५६ या क्रमांकावर प्रभाग क्रमांक तसेच तक्रार कोड, नाव, पत्ता ही माहिती द्यावी लागेल. पाणी गळती, पाणी कमी दाबाने येणे, पाणी न येणे, दूषित पाणीपुरवठा, टँकरने होणारा पाणीपुरवठा, अनधिकृत नळजोड आदी तक्रारी या योजनेत करता येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा