वीजबिलातील अचूकता व ग्राहकांमध्ये अधिकाधिक विश्वासार्हता निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’ कडून गेल्या काही वर्षांपासून वीजबिलावर देण्यात येणारा मीटरचा फोटो आता कालबाह्य़ होणार आहे. शहराच्या विविध भागात आता नवे अत्याधुनिक वीजमीटर बसविण्यात येत आहेत. या मीटरच्या साहाय्याने होणाऱ्या वीजबिलाच्या नव्या यंत्रणेत मीटरच्या फोटोची व्यवस्था नसणार आहे.
वापरली जाणारी वीज व प्रत्यक्ष मिळणारा महसूल यातील मोठी तफावत लक्षात घेता ‘महावितरण’ कडून मागील काही वर्षांपासून वीज वितरणातील तूट कमी करून वसुली वाढविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात वीजचोरांविरुद्ध कठोर मोहीम उघडण्याबरोबरच थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्यक्ष वीजवापरानुसार अचूक बिल मिळण्यासाठी वेळोवेळी बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून वीज मीटर बसविण्यात आले आहेत.
प्रत्यक्षात मीटपर्यंत जाऊन रीडिंग घेताना होणाऱ्या चुका लक्षात घेता, त्याचप्रमाणे ग्राहकांना प्रत्यक्ष त्यांनी वापरलेल्या युनिटची माहिती मिळण्याच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी फोटो मीटर रीडिंग ही यंत्रणा आणण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष मीटरचा फोटो घेऊन तो वीजबिलावर छापण्यात येतो. त्यामुळे रीडिंग घेतल्याच्या तारखेचे मीटरमधील आकडे ग्राहकाला स्पष्ट दिसत असल्याने बिलाच्या यंत्रणेमध्ये मोठे परिवर्तन झाले.
सध्या महावितरणकडून कमी वेळेत अचूक मीटर वाचन व वीजवापराबाबत नेमके देयक देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) व इन्फ्रारेड (आयआर) मीटर बसविण्यात येत आहेत. सध्याच्या फोटो मीटर रीडिंग पद्धतीमध्ये मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर असल्याने बिलांमध्ये चुका होतात, असे ‘महावितरण’ चे म्हणणे आहे. नव्या मीटरच्या माध्यमातून बिलाच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. दोन्ही प्रकारच्या मीटरचे मासिक वीजवापराचे रीडिंग हॅण्ड हेल्ड या यंत्रणेद्वारे घेऊन ही माहिती थेट संगणकाला जोडून वीजबिल तयार करण्यात येईल. त्यामुळे त्यात मीटरचा फोटो काढणे, हा भाग येणार नाही.
नव्या मीटरसाठी ग्राहकाला कोणताही खर्च करावा लागत नाही. शहरी भागामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर बसविल्यानंतर सुमारे ३० मीटर अंतराच्या परिघातील प्रतिमीटर सात सेकंद वेगाने हॅण्ड हेल्ड यंत्रणेच्या माध्यमातून शेकडो वीजमीटरचे वाचन करता येणार आहे. त्यामुळे रीडिंगमधील मानवी चुका, अडथळे दूर होऊ शकणार आहेत, या ‘महावितरण’  च्या दाव्याची प्रत्यक्षात नव्या यंत्रणेनुसार बिले देण्यास सुरुवात झाल्यानंतरच प्रचिती येऊ शकणार आहे.

Story img Loader