लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिनदर्शिकेमध्ये महावीर जयंतीच्या दिवशी महावीर जैन यांच्याऐवजी गौतम बुद्धांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमून समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषी परदेशी यांनी या संदर्भात आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेत ४ एप्रिलला असलेल्या महावीर जयंतीच्या दिवशी गौतम बुद्ध यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. विद्यापीठासारख्या संस्थेकडून अशी चूक होणे स्वीकारार्ह नाही. विद्यापीठालाच महावीर जैन आणि गौतम बुद्ध ओळखता येत नाही का, विद्यापीठालाच काही कळत नसेल तर विद्यार्थ्यांना काय शिकवले जाणार, असा प्रश्न आहे. हा प्रकार गंभीर आहे. विद्यापीठाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमण्यात येईल. चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्टीकरण कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिले.