फोटोग्राफी म्हणजे क्षणाचे चित्र पकडणे. निसर्गाशी एकरूप होण्याची भावना छायाचित्रामध्ये आली, तर छायाचित्र पाहणाऱ्यांमध्येही ती भावना जागृत होते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी शनिवारी व्यक्त केले.
फोटोग्राफी कलेचे १७५ व्या वर्षांतील पदार्पण आणि छायाचित्र टिपण्याच्या कलेतील तीन दशकांचा प्रवास हे औचित्य साधून सतीश पाकणीकर यांच्या ‘व्ह्य़ूफाइंडर’ या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी डॉ. अनिल अवचट आणि ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. पाकणीकर यांच्या ‘भिंगलीला’ या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. बुलडाणा अर्बन को-ऑप पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे या वेळी उपस्थित होते. बालगंधर्व कलादालन येथे गुरुवापर्यंत (३ ऑक्टोबर) दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
अवचट म्हणाले, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाइलने छायाचित्र टिपणे किती सोपे झाले आहे. पूर्वी कॅमेऱ्याबरोबर तंबू घ्यावा लागायचा. फिल्म रोल आल्यापासून फोटो काढणे सोपे झाले. आता तर, काय एका क्लिकमध्ये मोबाइलवर फोटो निघू शकतो. पाकणीकर यांचे हे पुस्तक वाचताना मी किती जणांच्या खांद्यावर उभा आहे हे समजते. प्रदर्शन पाहून नुसते जगणे आणि संदर्भासहित जगणे म्हणजे काय याची प्रचिती येते. पाकणीकर यांच्याकडे ती नजर आणि दृष्टी आहे. छायाचित्रामध्ये सहजता यावी यासाठी छायाचित्रकाराला किती क्लृप्त्या लढवाव्या लागतात हे मला माहीत आहे. हे पुस्तक मराठीमध्ये लिहून आपली संस्कृती आणि भाषा यांचे स्वत्व जपले आहे.
डॉ. जब्बार पटेल म्हणाले, प्रतिमा हीच छायाचित्राची चौकट आहे. त्यामध्ये उत्कट क्षण टिपणे हेच खरे कसब असते. एका अर्थाने छायाचित्र काढणे हा इतिहास टिपण्याचाच एक भाग असतो. ज्यांनी हे माध्यम समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्या माध्यमाच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा