Mahayuti Clashes in Pune: विधानसभेच्या जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मारामाऱ्या होतील, असे विधान मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. त्याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. महायुतीत कागल आणि पुण्यातील इंदापूरच्या जागेवरून वाद पेटला आहे. तसेच पुण्यात अजित पवार गटाने भाजपा आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात सोमवारी (दि. २६ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३०० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विकास कामाच्या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो गायब असल्याचे निदर्शनास आले. यावरून भाजपाचे नेते आणि वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आक्षेप घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगदीश मुळीक म्हणाले की, महायुतीमध्ये फक्त भाजपा, शिवसेना आणि आरपीआय (अ) युती धर्म पाळणार आहे का? त्यामुळे महायुतीमधील पक्षांमध्ये धुसफूस असल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. १८ ऑगस्ट रोजी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा जुन्नरमधील नारायणगाव येथे पोहोचली असताना भाजपा पदाधिकाऱ्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. पर्यटन खात्याशी संबंधित बैठकीदरम्यान अजित पवार गटाचे नेते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बॅनरवर शिंदे आणि फडणवीस यांचा फोटो न लावल्यामुळे वाद उद्भवला होता.

हे वाचा >> Ajit Pawar : ‘सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार?’, अजित पवार म्हणाले, “मी आज…”

बॅनरवर फोटो लावण्यावरून वाद पेटल्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमात फक्त स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित खात्याचे मंत्री आणि जे मान्यवर उदघाटन कार्यक्रमासाठी येणार आहेत, त्यांचेच फोटो बॅनरवर लावण्याचा नियम महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी केला आहे. त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.

अजित पवार यांच्या भूमिकेवर बोलताना माजी आमदार मुळीक म्हणाले की, उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन केले. त्या प्रकल्पासाठी महायुतीच्या नेत्यांनीही प्रयत्न केले होते. “दरम्यान वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे विसरले आहेत की, राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारनेच या प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविला. तरीही टिंगरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटोशिवाय बॅनर लावले आहेत”, अशी टीका मुळीक यांनी केली.

पुणे विमानतळ नामकरणावरून नाराजी?

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरूही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव दिले जाईल, असे सांगितले. राज्याने पाठविलेल्या प्रस्तावानंतर केंद्र सरकार सदर निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव विमानतळाला देण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि नागपूर विमानतळाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्यात आलेले आहे. आमच्यात वेगवेगळी मते असू शकतात. पण एकत्र बसून त्यावर तोडगा काढू.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photos of cm eknath shinde and devendra fadnavis missing from banners as ajit pawar launches projects in pune kvg