पुणे : राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला असून फुलराणीची कामे सुरू झाली आहेत. येत्या २६ जानेवारीपासून फुलराणी सुरू करण्याचा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. फुलराणी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी फुलराणीतून वार्षिक तब्बल २९ लाखांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते. सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर कात्रज उद्यानातील बालगोपाळांचे प्रमुख आकर्षण असलेली फुलराणीकडे दुर्लक्ष झाले. फुलराणीच्या रुळांची दुरवस्था झाली. त्यामुळे, फुलराणी बंद पडली. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली होती.

हेही वाचा – पुण्याच्या मावळमध्ये यात्रेत गावगुंडाचा हवेत गोळीबार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दारूच्या नशेत कृत्य

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. फुलराणी पुन्हा सुरू करण्यासाठी वसंत मोरे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार फुलराणीच्या कामांसाठी व्हेईकल डेपो विभागाने कामे सुरू केली आहेत. या कामांना प्रारंभ झाला आहे. सध्या रुळाची कामे सुरू असून, २६ जानेवारी पर्यंत कामे पूर्ण होतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले. फुलराणी सुरू होणार असल्याची माहिती मोरे यांनी समाजमाध्यमातूनही जाहीर केली आहे.

हेही वाचा – मुंबई : म्हाडा सोडतीची नोंदणी आता आणखी सोपी

राजकीय अनास्थेमुळे कात्रज उद्यानातील तिरंगा फडकणे बंद झाले आहे. फुलराणीही बंद ठेवण्यात आली होती. उद्यानातील कारंजेही सुरू करण्यासंदर्भात सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला. कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, तसेच तेथील तलावात उभारण्यात आलेला श्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, संगीत कारंजे, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पाटलांचा वाडा, शिवाजीराजांच्या जीवनचरित्राची ओळख करून देणारे आगळे ग्रंथसंग्रहालय ही विविध आकर्षणे ठरत असतानाच बालगोपाळांसाठीची फुलराणी बालगोपाळांचे नवे आकर्षण ठरली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phulrani in katraj udyan pune will start soon mns leader vasant more took initiative pune print news apk 13 ssb