पुणे : राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेत फुलराणी नव्या दमात रूळावर आणली आहे. प्रजासत्ताक दिनापासून बालगोपाळांच्या सेवेत फुलराणी आणण्याचा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला होता. फुलराणीची कामे झाल्यानंतर वसंत मोरे यांनी समाजमाध्यमातून सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

‘एकदा ठरविले ना की मी काम पूर्ण करतोच, अशी पोस्ट करत त्यांनी विरोधकांना चिमटा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. फुलराणी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी फुलराणीतून वार्षिक तब्बल २९ लाखांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते.

हेही वाचा >>> पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल

सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर कात्रज उद्यानातील बालगोपाळांचे प्रमुख आकर्षण असलेली फुलराणीकडे दुर्लक्ष झाले. फुलराणीच्या रूळांची दुरवस्था झाली. त्यामुळे फुलराणी बंद पडली. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली होती. महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. फुलराणी पुन्हा सुरू करण्यासाठी वसंत मोरे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार फुलराणीच्या कामांसाठी व्हेईकल डेपो विभागाने कामे सुरू केली होती.

हेही वाचा >>> कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी १७२० ईव्हीएम दाखल

फुलराणीची सर्व कामे पूर्ण करून २६ जानेवारीपासून फुलराणीची सेवा सुरू करण्याचा निर्धार मोरे यांनी व्यक्त केला होता. कामे सुरू झाल्यानंतर राजकीय अनास्थेमुळे फुलराणीच्या रूळा खाली असलेल्या लाकडाला वाळवी लागल्याची पोस्टही त्यांनी केली होती. सध्या ही सर्व कामे पूर्ण झाली आहे. त्याबबतची माहिती मोरे यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. ‘आणि पाच वर्ष धूळ खात पडून असलेली फुलराणी नव्या दमात आणलीच. एकदा ठरविले ना की मी काम पूर्ण करतोच’, अशी प्रतिक्रिया देत वसंत मोरे यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे.

Story img Loader