पुणे : मनसे नेते वसंत मोरेंच्या पुढाकाराने ‘फुलराणी’ पुन्हा धावणार आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने रुळाखाली असलेल्या लाकडी स्लीपरला वाळवी लागली आहे. याबाबतचे फोटो शेअर करत मोरे यांनी ट्विट करत लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले आहे. राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला असून फुलराणीची कामे सुरू झाली आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज येथील आजी-आजोबा उद्यानात फुलराणी सुरू केली होती. फुलराणी सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी फुलराणीतून वार्षिक तब्बल २९ लाखांचे विक्रमी उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले होते. सन २०१७ च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली. त्यानुसार वसंत मोरे यांचा प्रभाग बदलला गेला. त्यानंतर कात्रज उद्यानातील बालगोपाळांचे प्रमुख आकर्षण असलेली फुलराणीकडे दुर्लक्ष झाले. फुलराणीच्या रुळांची दुरवस्था झाली. त्यामुळे, फुलराणी बंद पडली. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसेकडून सातत्याने आंदोलने करण्यात आली होती.
हेही वाचा >>> “राज ठाकरेंना वैयक्तिक विरोध नाही”, ब्रिजभूषण सिंह यांचं पुण्यात विधान; म्हणाले…
महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर कारभार प्रशासकांच्या हाती आला. फुलराणी पुन्हा सुरू करण्यासाठी वसंत मोरे यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार फुलराणीच्या कामांसाठी व्हेईकल डेपो विभागाने कामे सुरू केली आहेत. या कामांना प्रारंभ झाला आहे. सध्या रुळाची कामे सुरू असून, २६ जानेवारी पर्यंत कामे पूर्ण होतील, असे वसंत मोरे यांनी सांगितले. दरम्यान, ही कामे सुरू असतानाच फुलराणी धावणाऱ्या रुळांखालील लाकडी स्लिपरला वाळवी लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मोरे यांनी ट्विटरवर फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.