पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे १७ वर्षीय अल्पवयीन ऊस तोड कामगार तरुणीवर तिच्या काकानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पिंटू खरात असं या ३० वर्षीय काकाचं नाव आहे. तो मूळचा जालना येथील आहे. आरोपीने ४ महिन्यांपूर्वी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर आता आरोपी काका विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील कॅनॉलच्या कडेला ऊस तोड कामगारांची खोपी आहे. तिथे पीडित तरुणी कुटुंबियांसोबत राहते. ऑक्टोबर २०२१ मध्ये ती खोपीमध्ये झोपली असताना आरोपी पिंटू खरात याने तिला बाहेर बोलवले आणि दम देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवरच बलात्कार, नराधम बापाला २० वर्षांच्या सक्तमजुरीसह ५० हजारांचा दंड
या घटनेने भेदरून केलेल्या पीडित तरुणीने भीतीमुळे याबाबत कुटुंबियांना सांगितले नाही. यानंतर काही दिवसांनी पीडित तरुणीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणी केली असता १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी १३ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर पीडित तरुणीने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर आरोपी पिंटू खरात विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.