चिन्मय पाटणकर chinmay.reporter@gmail.com
नाटक हे दोन व्यक्तिरेखांमधील संवादापुरतंच मर्यादित नसतं. तर शारीर भाषेतूनही नाटय़ उलगडता येऊ शकतं, लयबद्ध हालचालीतूनही अर्थपूर्ण आशयनिर्मिती करता येऊ शकते. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला फिजिकल थिएटर हा प्रकार गेल्या काही काळात पुण्यातही चांगल्या रितीनं रूजू लागला आहे.
याच प्रकारातील ‘समटाइम समवेअर’ ही नाटय़कृती ५ मार्चला पाहता येईल, तर ‘इन ट्रान्झिट’ ही नाटय़कृती नेपाळमधील आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवासाठी निवडली गेली आहे.
समटाइम समव्हेअर
राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या थेस्पो या स्पर्धेत ‘समटाइम समव्हेअर’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. नृत्याच्या माध्यमातून कर्म या संकल्पनेवर आधारित एक बोधकथा एक कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विघ्नहर्ता थिएटर्स या संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचं लेखन संकल्प महाबळेश्वरकरनं केलं आहे, तर प्रणव रत्नपारखीनं दिग्दर्शन केलं आहे. हरणाच्या पिल्लाची आदिमानव शिकार करतो. त्यावेळी त्या पिल्लाचे पालक दुखी होतात. मात्र, पुढे जाऊन त्या आदिमानवाच्या मुलाची वाघ शिकार करतो तेव्हा आदिमानवाची काय अवस्था होते हे या नाटकात मांडण्यात आलंय. ओंकार पेंडसे, नेहा ताठे, प्रथमेश अत्रे, ऋत्विज कुलकर्णी, श्रुती गुप्ते, संघर्ष जोगदंड, क्षितिजा पाध्ये आदींच्या नाटकात भूमिका आहेत. ५ मार्चला रात्री साडेनऊ वाजता अण्णा भाऊ साठे नाटय़गृहात नाटकाचा प्रयोग सादर होईल. सोबत लोकसत्ता लोकांकिकामधील पारितोषिकप्राप्त अंधार ही एकांकिकाही सादर करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी प्रवेश मूल्य आहे.
इन ट्रान्झिट
नेपाळ आंतरराष्ट्रीय नाटय़महोत्सवात ‘इन ट्रान्झिट’ या नाटकाची निवड झाली आहे. महोत्सवाअंतर्गत काठमांडू आणि पोखरा या शहरांमध्ये नाटकाचे प्रयोग होतील. शहरी जगण्यात आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं. या घडामोडी कळत नकळत आपल्या शरीरातही मुरतात आणि आपलं शरीरही शहर होऊन जातं. शरीराचं शहर होण्याचं हे नाटय़ ‘इन ट्रान्झिट’ या नाटकाद्वारे रंगमंचावर आलं आहे. मूळची आरजे असलेल्या आदिती वेंकटेश्वरननं या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. या नाटकात आदितीसह तन्वी हेगडे, राधिका राठोड, मैत्रेयी जोशी आणि अंकिता शिंघवी यांचा सहभाग आहे. नृत्य शैली आणि नॉन व्हर्बल प्रकारातलं हे नाटक आहे. अ?ॅन मायकल यांच्या ‘सो मच ऑफ अवर सिटी इज इन अवर बॉडी’ या वाक्यातून हे नाटक साकारलं आहे. नाटकाला रुढार्थानं गोष्ट अशी नाही. मात्र, रोजच्या जगण्यातून आपल्या शरीराचं काय होतं याचा विचार या नाटकातून मांडण्यात आला आहे. आयपार या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. विद्यानिधी वनारसे यांनी प्रकाश योजना आणि उदयन धर्माधिकारी यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.