पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) वतीने ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार आणि ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हेही वाचा >>>पुणे: अतिप्रसंगास विरोध केल्याने अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न
मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे गुरुवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या महोत्सवाच्या उदघाटन समारंभात पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
महोत्सवाच्या उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियंका बर्वे हे सहकलाकारांसह गायन सादर करतील. तर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि सहकलाकार नृत्य सादर करतील. सायंकाळी साडेसात वाजता अली अब्बासी दिग्दर्शित ‘होली स्पायडर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.