काबाडकष्ट करून प्रेमाने वाढवणाऱ्या आई-वडिलांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी पुण्यातील एका तरूणाने युरोपातील सर्वात उंच शिखर सर केलं. ही कामगिरी केल्यानंतर तरुणानेआई-वडिलांचा फोटो दाखवत आनंद व्यक्त केला. ‘तुमच्यासाठी कायपण’ या वाक्याच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाईने आई-वडिलांसाठी देखील प्रेम आणि आदर दाखवायला हवा, असा संदेश देण्याचा प्रयत्नच पिंपरी-चिंचवडमधील या तरुणाने केलाय. सचिन कणसे असे त्याचे नाव असून तो पिंपळे निळख येथील रहिवासी आहे.
४२ वर्षांच्या या तरुणाने युरोपातील माउंट एलब्रस हे सर्वात उंच शिखर सर केलं. शिखरावर पोहचल्यानंतर आई वडिलांचा फोटो दाखवत त्याने त्यांच्याविषयी असणारे प्रेम व्यक्त केले. प्रत्येकाने आई-वडिलांचा आदर करावा, असा संदेशच त्याने या कृतीतून दिला. आई सिंधुबाई आणि वडिल दगडू यांच्यावर सचिनचे खूप प्रेम आहे. हल्लीच्या विभक्त कुटुंबपद्धतीत सर्वत्रच हे चित्र दिसत नाही. सचिनला आपले हे विचार समाजापर्यंत पोहचवायचे होते. त्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या रात्री एकच्या सुमारास त्याने माऊंट एलब्रुसची चढाई करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता त्याने शिखर सर केले. माऊंट एलब्रूस हे रशिया आणि जॉर्जिया या देशाच्या सीमारेषेवर असलेलं शिखर आहे. त्याची उंची समुद्रसपाटी पासून ५ हजार ६४२ मीटर इतकी आहे.