‘भाऊबंदकी’चे नाटय़ सुरू; खुल्या जागेसाठी सर्वाधिक चुरस
प्रभाग क्र. १४ काळभोरनगर-मोहननगर-दत्तवाडी-विठ्ठलवाडी
एखाद्या गावातील ‘गावकी-भावकी’चा वाद रंगतो, त्याच पध्दतीने चिंचवडला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेट्टी बंधूंमधील त्रांगडे राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय ठरला आहे. एकाच प्रभागात, एकाच पक्षात जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी आणि प्रसाद शेट्टी या तीन नगरसेवक बंधूंनी उमेदवारीवर दावा केला आहे. जागा एक आणि दावेदार तीन असल्याने कोणी, कोणासाठी आणि का माघार घ्यावी, यावरून बऱ्यापैकी ‘भाऊबंदकी’चे नाटय़ सुरू झाले आहे.
[jwplayer izOWW4O7]
चिंचवडला काळभोरनगर, मोहननगर, दत्तवाडी, विठ्ठलवाडी असा भला मोठा आणि विचित्र असा प्रभाग झाला आहे. झोपडपट्टय़ा, सोसायटय़ा, बैठी घरे आणि चाळींचा समावेश असलेल्या या नव्या प्रभागात एक खुला, एक ओबीसी व दोन सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे. सर्वाधिक चुरस खुल्या जागेसाठी आहे. उल्हास, जगदीश व प्रसाद शेट्टी यांच्या प्रभागाचे क्षेत्र एकाच प्रभागात आले आहे. याशिवाय, वैशाली काळभोर, जावेद शेख, सुजाता टेकवडे हे अन्य नगरसेवक तसेच नगरसेविका चारुशीला कुटे यांचा मुलगा प्रमोद रिंगणात असू शकणार आहे. जगदीश व उल्हास यापूर्वी मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातून शहाणे होत यंदा त्यांनी खुल्या गटातून लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र, एकाच जागेमुळे तिढा झाला आहे. उल्हास व जगदीश सख्खे भाऊ आहेत, तर प्रसाद भावकीतील घटक आहे. तीनही शेट्टी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. जगदीश व उल्हास शेट्टी यांच्या उमेदवारीवरून यापूर्वी वेळोवेळी वाद झाला होता. त्यात आता तिसऱ्या म्हणजे प्रसाद शेट्टी यांची भर पडली आहे. उल्हास हे योगेश बहल यांचे, जगदीश हे आझम पानसरे यांचे तर प्रसाद शेट्टी हे अण्णा बनसोडे, मंगला कदम यांचे समर्थक मानले जातात. सर्वाना धरून राहणे हे शेट्टी बंधूंचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे उमेदवारीवरून नेत्यांमध्ये जुंपणार आहे. निवडून येण्याची क्षमता हाच ‘कारभारी’ अजित पवार यांचा मुख्य निकष असल्याने शेट्टी बंधूंना आपापली लोकप्रियता तपासून घ्यावी लागणार आणि ती नेत्यांपुढे सिद्ध करावी लागणार आहे. वेळप्रसंगी शेट्टी बंधू आमने-सामने येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. याशिवाय, ओबीसीतून जावेद शेख, विजय गुप्ता, गणेश लंगोटे दावेदार आहेत. मारुती भापकर खुल्या की ओबीसी गटातून लढणार, हे गुलदस्त्यात आहे.
[jwplayer 1yLms27W]