चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला होता. अश्विनी जगताप आमदार झाल्यानंतर आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे. जगताप कुटुंब फोडण्यासाठी स्वकियांनी प्रयत्न केले, अशी खंत शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.
शंकर जगताप बोलताना म्हणाले, “जगताप कुटुंबियांना फोडण्यासाठी परकीयांनी प्रयत्न केलं. पण, स्वकियांनी देखील तसे प्रयत्न केलं. अशी वेळ दुश्मनांच्या कुटुंबियांवरही येऊ नये. स्वकियांचे हे दु:ख कायम मनात राहील. तसेच, अश्विनी वहिनींना आमदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली,” असेही शंकर जगताप यांनी म्हटलं.
या कार्यक्रमात बोलताना अश्विनी जगताप यांनी सांगितलं, “२०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत १५ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता जात भाजपा सत्तेत आली. तेव्हा. भाजपचे १०० नगरसेवक निवडून आणत पिंपर-चिंचवड महापालिकेत एक हाती सत्ता आणली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महापालिकेवर पुन्हा भाजपाचा झेंडा फडकवणार,” असा विश्वास अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : “शीतल म्हात्रेंचा ‘तो’ VIDEO प्रकाश सुर्वेंच्या मुलानेच…”, वरुण सरदेसाई यांचं मोठं विधान
या मेळाव्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा विधानसभा प्रभारी संतोष कलाटे उपस्थित होते.