पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचे महापालिकेने सर्वेक्षण हाती घेतले आहे. आतापर्यंत अडीच हजार बांधकामे आढळली आहेत. या अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची लांबी २०.८५ किलोमीटर आहे, तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. या नद्यांच्या पुराची सरासरी निश्चिती करून निळी पूररेषा आखली आहे. या पूररेषेत कोणतेही बांधकाम करता येत नाही. शहर आणि परिसरात दिवसेंदिवस लाेकसंख्या वाढत असताना तिन्ही नद्यांच्या पूररेषेतही अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे दर वर्षी पावसाळा आला, की या मालमत्तांमध्ये पुराचे पाणी शिरते. यंदाच्या पावसाळ्यातही नदीकाठच्या घरांमध्ये दाेन वेळा पाणी शिरल्याच्या घटना घडल्या हाेत्या.

हेही वाचा – भाजपमध्ये सुंदोपसुंदी; ‘गृहकलहा’नंतर जगताप कुटुंबीयांना माजी नगरसेवकांकडून आव्हान

या पार्श्वभूमीवर महापालिकेने पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण करून कारवाईचे नियाेजन केले आहे. त्यानुसार पवना, इंद्रायणी, मुळा या नदीकाठच्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात २५०० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. त्यात व्यावसायिक, निवासी बांधकामांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत महापालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच ओढा आणि नाल्यावरील अतिक्रमण आणि बांधकामे काढण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार, इंद्रायणी नदीच्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले चिखलीतील बंगलेही पाडण्यात येणार आहेत.

हेही वाचा – पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ, ३०० जणांचे मोबाइल चोरी; नाशिक, मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड

नदीच्या पूररेषेत आढळलेल्या २५०० अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस दिली आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीला व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri 2500 unauthorized constructions in flood line of pavana indrayani mula rivers the municipal corporation gave this warning pune print news ggy 03 ssb