पिंपरी : शहरात गतवर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापाेडी आदी भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने यंदा महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामाला २० फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. या काळात ३० टक्के नालेसफाई झाली आहे. कामाला गती देण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलाेमीटर अंतराचे १४३ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लॅस्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर व दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दर वर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, चेंबर आणि गटारे स्वच्छ केली जातात. त्यामुळे उन्हाळ्यातच हे काम पूर्ण करणे आवश्यक असते. त्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने २० फेब्रुवारीपासून नालेसफाई सुरू करण्यात आली.

या नालेसफाईचा आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला. या बैठकीला आराेग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, आराेग्य विभागातील अधिकारी उपस्थित हाेते. या बैठकीत आयुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयानुसार नालेसफाईचा आढावा घेतला. ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयातील नालेसफाईचे काम मंद गतीने सुरू असून, येथील कामाला गती देण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

शहरातील नालेसफाईच्या कामाला यंदा लवकरच सुरुवात केली आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने सफाई केली जात आहे. आतापर्यंत ३० टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. प्रत्येक साेमवारी नालेसफाईचा आढावा घेण्यात येत आहे. नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे छायाचित्र घेतले जात आहे.

सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका