पिंपरी : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. ७ ते १७ सप्टेंबर या दरम्यान श्री गणेशाचे आगमन ते विसर्जन या कालावधीत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलीस सज्ज राहणार आहेत. ध्वनी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या सूचनाही पोलिसांनी गणेश मंडळांना केल्या आहेत.

गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेने पार पाडावा, कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण होऊ नये, यासाठी या कालावधीत पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. एक पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, ११ सहायक पोलीस आयुक्त, ५३ पोलीस निरीक्षक, २४५ सहायक पोलीस निरीक्षक आणि फौजदार, २३३८ पोलीस अंमलदार, ५५० होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, बॉम्ब शोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथक, ११ आरसीपी स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त सज्ज राहणार आहे.

हेही वाचा – कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयावर टीकेची झोड, निर्णय रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाणे यांनी सर्व गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यादृष्टीने सुचना देण्यात आल्या आहेत. नागरीक व गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

मंडळांनी कमीत कमी ध्वनीक्षेपकाचा वापर करावा

सार्वजनिक गणेश मंडळानी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवावेत. विद्युत रोषणाईचा व ध्वनिक्षेपकाचा वापर कायदेशीर मर्यादेत करावा. ध्वनीची पातळी नियंत्रित ठेवावी. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) व नियमानुसार रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय, दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी शंभर मीटर परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये तसेच मंडळांनी ध्वनीक्षेपकाचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – उद्योजकांना धमकावल्यास पोलीस आयुक्तांकडून कडक कारवाईचा इशारा, आयटी कंपनीतील अधिकाऱ्याला धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

प्लास्टिकचा वापर टाळावा अन्यथा दंडात्मक कारवाई

गणेशोत्सव कालावधीत रस्ता पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही. सार्वजनिक मंडळ परिसरात फुलांचे हार, नारळ, मिठाई, प्रसाद इत्यादी दुकाने कमीत कमी असतील याची दक्षता घ्यावी. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहने, रिक्षा सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक राहील. महाराष्ट्र शासनाचे अधिनियमानुसार प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिक वस्तूंवर बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.