ज्येष्ठ नागरिकाकडे ५० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी भोसरी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. संतोषकुमार बाळासाहेब गित्ते (वय ३१, नेमणूक – भोसरी महावितरण कार्यालय, रा. चऱ्होली फाटा) असे या अभियंत्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी या कारवाईबाबतची माहिती दिली. पिंपरीस्थित तक्रारदार हे ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांची भोसरी एमआयडीसी परिसरात स्वत:ची कंपनी आहे. या कंपनीतील विद्युत मीटरजोड त्यांना बंद करायचा होता. त्यासाठी त्यांनी भोसरी महावितरण कार्यालयात अर्ज केला. मात्र, यासाठी ५० हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी गित्ते याने केली.

यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पडताळणी केल्यानंतर या विभागाने गित्तेच्या विरोधात कारवाई केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गित्तेला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक वीरनाथ माने पुढील तपास करत आहेत.

Story img Loader