पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या (पीआयईसीसी) जागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार होता. पुतळ्यासाठी चौथरा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ती जागा योग्य नसल्याने दर्शनी भागात पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. आता हा पुतळा पीएमआरडीएच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या जागेत उभारला जाणार आहे. पीएमआरडीएने मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील अडीच एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. या जागेत पुतळा उभारण्याचे काम धनेश्वर कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे. या ठेकेदाराने पुतळ्याचे काम शिल्पकार राम सुतार यांना दिले आहे. दिल्लीत पुतळा तयार करण्याचे काम सुरू आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या मंजूर संरचनेनुसार हे काम केले जात आहे.

महापुरुषांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांंची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या नव्या जागेत हा पुतळा उभारण्याचा ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन पुतळा उभारणीचे काम केले जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रदर्शन, संग्रहालय, सुशोभीकरण, उद्यान, प्रकाश व्यवस्था, ध्वजस्तंभ याबाबतचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत काम

छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळ्यासाठी आवश्यक चौथऱ्याचे काम करण्यात येणार असून, त्यासाठी १२ कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात संभाजी महाराजांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ कोटी ८४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात पुतळा चौथऱ्याची उर्वरित कामे आणि परिसर सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी १५ कोटी ११ लाख रुपयांचा खर्च होणार आहे.

दर्शनी भागात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्थळ बदलले आहे. मोशी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र परिसरात हा पुतळा उभारण्यात येणार आहे. जुन्या ठिकाणी चौथऱ्याचे काम झाले आहे. तो खर्च वाया जाणार नाही. त्या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा उभारण्याचे नियोजन असल्याचे सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी सांगितले.

Story img Loader