पिंपरी : महापालिका प्रशासन आणि लाेकप्रतिनिधींनी उद्याेगांवर कारवाई हाेणार नसल्याचे सांगून गाफील ठेवले. मात्र, त्यानंतर कुदळवाडी, चिखली भागात सरसकटपणे कारवाई केल्याचा आराेप पिंपरी-चिंचवड लघुउद्याेग संघटनेने बुधवारी केला. दरम्यान, उद्योजकांना यंत्रसामग्री हटविण्यासाठी पुरेसा कालावधी दिल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुदळवाडीत पाच दिवसांपासून महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. आतापर्यंत १२०० लघु उद्याेगांवर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित उद्याेगांवरील कारवाई थांबवावी. त्यांना यंत्रसामग्री काढण्यासाठी तीन महिन्यांची मुदत द्यावी. उद्योजकांच्या मालकीच्या जागेवरील साहित्य हटविण्याची सक्ती करू नये, असे संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, संजय सातव, नवनाथ वायाळ, विनोद मित्तल, भारत नरवडे यावेळी उपस्थित होते.

‘आठ जानेवारीपासून नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. विरोध झाल्यानंतर पुन्हा सात दिवसांची मुदत देण्यात आली. यंत्रसामग्री हटविण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात आला आहे’ असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

२ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

चिखली येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत २०२ लाख २९ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली २ हजार ८४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान ४६५ एकर भूभागावर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली असून ही कारवाई यापुढेही चालू राहणार आहे.