पिंपरी विधानसभा मतदारसंघ

शहरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तुल्यबळ आहे. राष्ट्रवादीचे झाडून सगळे नेते या पट्टय़ात असल्याने सर्वाधिक नगरसेवक येथूनच निवडून येतील, असा विश्वासही राष्ट्रवादीला आहे. तथापि, गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये झालेले ‘इनकिमग’ विशेषत: भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या माजी खासदार गजानन बाबर व माजी महापौर आझम पानसरे यांचे कार्यक्षेत्र हाच परिसर असल्याने भाजपचेही बळ वाढलेले आहे.

दापोडी ते निगडी अशा सरळ पट्टय़ात पिंपरी मतदारसंघ पसरला आहे. पालिकेचे ३० नगरसेवक या भागातून निवडून येणार आहेत. भल्यामोठय़ा ‘हवेली’चे विभाजन होऊन शहरात तीन विधानसभा मतदारसंघ झाले, त्यातील पिंपरी राखीव मतदारसंघ झाला. तेव्हापासून या भागातील राजकीय गणिते पूर्णपणे वेगळी झाली आहेत. स्वतंत्र झालेल्या पिंपरी मतदारसंघात काँग्रेसचा हक्काचा मतदार मोठय़ा प्रमाणात आहे. तरीही पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत बनसोडे शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्याकडून पराभूत झाले. चाबुकस्वार काँग्रेसचे नगरसेवक होते. विधानसभेसाठी ते शिवसेनेत गेले. भाजपने राज्यसभेवर संधी दिलेल्या खासदार अमर साबळे यांचे कार्यक्षेत्रही पिंपरी भागातच आहे. रपिंाइंच्या नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी, २०१४च्या पिंपरी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. रपिंाइंचे सर्व राजकारण पिंपरीत एकवटले आहे. पुढील विधानसभेसाठी नगरसेविका सीमा साबळे यांची, पिंपरीतच मोर्चेबांधणी सुरू आहे.

अशी पाश्र्वभूमी, असलेल्या पिंपरीत राष्ट्रवादीचे प्राबल्य दिसून येते. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, राजू मिसाळ अशी राष्ट्रवादीची तगडी टीम पिंपरीत आहे. मात्र, याच भागात वर्षांनुवर्षे प्रभाव टिकवून असलेले गजानन बाबर व आझम पानसरे नुकतेच भाजपमध्ये आल्याने समीकरणे बदलणार आहेत. बाबर यांचे चिरंजीव सूरज यांच्यासाठी मोहननगर-काळभोरनगरमध्ये, तर पानसरे यांच्या मुलासाठी शाहूनगर-संभाजीनगर प्रभागात चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीला आतापर्यंत बऱ्यापैकी िखडार पडले असून आणखी काही ताकदीची नावे भाजपमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, आबा ताकवणे, जावेद शेख, ज्ञानेश्वर भालेराव अशा पानसरे समर्थकांची चलबिचल सुरू आहे.  सेना आमदार चाबुकस्वार यांच्या पुतणीने राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. पिंपरीगाव-कॅम्प प्रभागात नाटय़मय घडामोडी सुरू असून ‘सिंधी-मराठी-माळी’ समाजाची गणिते जुळवली जात आहेत. पिंपरी विधानसभेसाठी वेळेपूर्वीच शड्डू ठोकून आयते दुखणे ओढावून घेतलेल्या जितेंद्र ननावरे यांना कथित ‘गॉडफादर’नेच वाऱ्यावर सोडल्याने ते पर्यायाच्या शोधात आहेत. श्याम लांडे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र, त्यांना राष्ट्रवादीने गळ टाकून ठेवला आहे. पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीला प्रभाव टिकवायचा आहे. तर, भाजपला अधिकाधिक नगरसेवक निवडून आणायचे आहेत. चाबुकस्वार यांना आमदारकीच्या राजकारणासाठी तरी आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. मनसे, काँग्रेसचा अस्तित्वासाठी लढा आहे, तर ‘एमआयएम’ची मुख्य मदार पिंपरीतच आहे.

चित्र असे आहे..

  • विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार (शिवसेना)
  • आगामी निवडणुकीनंतर नगरसेवकांची संख्या ३०
  • राष्ट्रवादीची गळती कायम
  • बाबर, पानसरे यांच्यामुळे गणिते बदलली

Story img Loader