पिंपरी : मासेविक्रीचे दुकान लावण्यासाठी हप्त्याची मागणी करत दोघींनी एका महिलेवार कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. हप्त्यासाठी सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने झुरळ मारण्याचे औषध प्राशन केले. ही घटना भोसरीतील मच्छी मार्केटमध्ये ८ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत रेश्मा सिकंदर शेख (वय २९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उज्वला अमोल गायकवाड (रा. घरकुल, चिखली), रसिका गोविंद जगताप (रा.भोसरी) दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे: फर्ग्युसन रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा
उज्वला, रसिका या दोघी रेश्मा यांच्या मासेविक्रीच्या दुकानावर आल्या. येथे मासे विक्री करायची असेल तर यापूर्वी माझा भाऊ कुक्याला हप्ते देत होते. तो आता तुरुंगात आहे. त्यामुळे आम्हा दोघींना हप्त्याचे पैसे द्यावे लागतील, नाही दिले तर व्यवसाय करु देणार नाही अशी धमकी दिली. रेश्मा यांच्यासह इतर विक्रेत्यांकडे दरमहा ७०० रुपये हप्त्याची मागणी केली. रेश्मा यांनी पैसे दिले नसल्याने त्यांना धमक्या, शिवीगाळ केली जात होती. दुकानावर येत ‘हप्त्याचे दोन महिन्याचे पैसे का दिले नाहीस’ असे म्हणत शिवीगाळ दमदाटी, मारहाण केली. रेश्मा त्याचा प्रतिकार करत असताना आम्ही दोघी तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत हल्ला केला. रसिका हिने रेश्माच्या मानेवर कोयता मारण्याचा प्रयत्न केला. रेश्माने कोयता चुकविला. या दोघींच्या त्रासाला कंटाळून रेश्माने झुरळ मारण्याचे औषध प्राशन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
© The Indian Express (P) Ltd