काँग्रेसचे पिंपरी पालिकेतील माजी नगरसेवक, सेवा दलाचे शहराध्यक्ष, प्रवक्ते, प्रभारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशा अनेक पदांवर काम केलेले बाबू नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी व काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचे कट्टर समर्थक म्हणून नायर ओळखले जातात. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी ‘जाता-जाता’ केला आहे.
चिंचवड वाल्हेकरवाडी येथे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत नायर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस सचिन पटवर्धन, संपर्कप्रमुख एकनाथ पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या संदर्भात नायर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या राजकारणामुळे आपण प्रभावित झालो. गेली ३४ वर्षे आपण काँग्रेसमध्ये काम करत आहोत. गेल्या १५ वर्षांत काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. त्यांना ताकद मिळत नाही, पक्षसंघटना वाढत नाही, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. आपल्याला लोकांचे काम करायचे आहे, त्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या भाजपचा पर्याय आपण निवडला, असे नायर यांनी म्हटले आहे.

Story img Loader