पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीचे पडसाद शहरात सोमवारी देखील उमटले. राज्य शासनाच्या विरोधात मनसेने पिंपरी चौकात निदर्शने केली. तर, डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन ही बदली रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. तर, शहरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.
आयुक्त परदेशी यांची बदली होणार असल्याच्या चर्चेने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. ही बदली अन्यायकारक असल्याचे सांगत मनसेचे शहराध्यक्ष मनोज साळुंके, गटनेते अनंत कोऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली आणि बदली रद्द करण्याची मागणी केली. चांगले काम करणाऱ्या आयुक्तांची बदली अन्यायकारक असल्याचे सांगत बदली रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री चव्हाण यांना दिल्याचे डॉ. संजीवकुमार पाटील यांनी सांगितले. धनंजय शेडबाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परदेशी यांची बदली होऊ नये, यासाठी अण्णा हजारे यांनी प्रयत्न करावेत, असे साकडे घातले. भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार यांनीही या बदलीस विरोध दर्शवला असून परदेशींची बदली झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आयुक्तांच्या संभाव्य बदलीवरून पिंपरीत वातावरण तापले
पिंपरी पालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संभाव्य बदलीचे पडसाद सोमवारी देखील उमटले. डॉक्टर मंडळींनी एकत्र येऊन ही बदली रद्द करावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
First published on: 21-01-2014 at 03:18 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri becomes sensational on probable transfer of dr srikar pardeshi